पुणे : वानवडी भागात गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. तरुणाकडून गांजा, दुचाकी, मोबाइल संच असा ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तौफिक रझाक शेख (वय २६, रा. नवाजीश चौकाजवळ, मीठानगर, कोंढवा खुर्द) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वानवडीतील गंगा सॅटेलाईट सोसायटी ते नेताजीनगर रस्त्यावर हा प्रकार घडला.
वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी विठ्ठल चोरमोले, अमोल गायकवाड हे गस्त घालत होते. शेख दुचाकीवरुन तेथे गांजा विक्रीसाठी आला होता. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून शेखला पकडले. पोलिसांनी त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली. तेव्हा पिशवीत ८१० गॅम गांजा सापडला. त्याच्याकडून गांजा, दुचाकी, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शेखने गांजा कोणाकडून आणला, तसेच तो गांजाची विक्री कोणाला करणार होता, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विठ्ठल चोरमोले, विष्णू सुतार, अमोल गायकवाड यांनी ही कामगिरी केली.
गुटखा विक्री प्रकरणात एकाला अटक
गुटख्याची विक्री करणाऱ्या एकाला खडक पोलिसांनी अटक केली. मनीष कांतिलाल गेहलोत (वय २०, रा. डाके चौक, सुखसागरनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई आशिष चव्हाण यांनी खडक पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार पेठेतील गाडीखाना चौकात एका दुकानासमोर गेहलोत गुटखा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खडक पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसंनी सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून गुटखा जप्त करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक काटकर तपास करत आहेत. राज्यात गुटखा विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. गुटखा बंदीनंतर शहरात छुप्या पद्धतीने गुटखा विक्रीस पाठविला जात असल्याचे दिसून आले आहे.