पुणे : विधासभा निवडणुकीमुळे राज्यात १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी शाळा सुरू ठेवण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याशिवाय ज्या शाळांमधील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी झाली आहे, त्या शाळेच्या नजीकच्या शाळेतील ज्या शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी झाली नाही, त्यांच्या मदतीने १८ आणि १९ नोव्हेंबर २०२४ रोजी शाळा सुरू ठेवाव्या लागणार असून, शाळा सुरू राहण्याबाबतची जबाबदारी गटशिक्षणाधिकाऱ्यांची असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षण आयुक्तालयाने १८, १९ आणि २० नोव्हेंबर रोजी शाळांना सुटी देण्याचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी शिक्षण विभागाला सादर केला होता. या अनुषंगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्याबाबत आयुक्त स्तरावरून आवश्यक त्या सूचना देण्याबाबतचे निर्देश शिक्षण आयुक्तांनी देण्याबाबत शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रकाद्वारे दिले होते. मात्र, या संदर्भात संभ्रम निर्माण झाल्याचे निदर्शनास आल्याने शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्टीकरण दिले. त्यानुसार १८ आणि १९ रोजी सर्व शाळा सुरू राहतील. कोणतीही सार्वत्रिक सुटी जाहीर केलेली नाही. केवळ ज्या शाळेत निवडणूक कामामुळे एकही शिक्षक उपलब्ध नसेल, अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारात सुटी जाहीर करावी, असे शिक्षण आयुक्तांनी स्पष्ट केले होते.

हेही वाचा…Ravindra Dhangekar: “निवडणूक हरत असल्याचे लक्षात येताच…” फडणवीसांच्या ‘ॲक्सिडेंटल आमदार’ टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर; पाहा व्हिडिओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पार्श्वभूमीवर अधिक स्पष्टतेसाठी शनिवारी सुधारित परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार ज्या शाळांमधील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी झाली आहे, त्या शाळेच्या नजीकच्या शाळेतील ज्या शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी झाली नाही, त्यांच्या मदतीने १८ आणि १९ नोव्हेंबर २०२४ रोजी शाळा सुरू ठेवाव्यात, राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या शाळा या १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी सुरू राहतील. याचे संपूर्ण नियोजन संबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी संबंधित मुख्याध्यापकांच्या मदतीने करावे. कार्यक्षेत्रातील सर्व शाळा सुरु राहतील याची संपूर्ण जबाबदारी संबंधित गटशिक्षणाधिकारी यांची राहील, असे नमूद करण्यात आले आहे.