पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या पुण्यातील दुसऱ्या मुक्कामात विविध संस्था-संघटनांच्या वतीने वारकऱ्यांची सेवा करण्यात आली. वारकऱ्यांसाठी मोफत नेत्रतपासणी, आरोग्य शिबिरे आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, आचार्य आनंदऋषीजी पुणे ब्लड सेंटर, रंगीलदास सुरतवाला ट्रस्ट आणि सुरतवाला बिझनेस ग्रुप यांच्या वतीने मोफत नेत्रतपासणी आणि चष्मे वाटप शिबिर शनिवारी आयोजिण्यात आले. माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, अंकुश काकडे, चंदन सुरतवाला, सुनील काळोखे, माजी आमदार मोहन जोशी सहभागी झाले.
कोकणस्थ परिवाराच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत मोबाइल चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. सुनील नेवरेकर, नीलम पांढरे, अनुराधा मांजरेकर, उत्तम वनारसे, गणेश निकम यांनी संयोजन केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, आमदार हेमंत रासने, अमाेल केदारी या वेळी उपस्थित होते.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि समर्थ युवा फाउंडेशनच्या वतीने वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, डॉ. कैलास खंडेश्वर जवादे उपस्थित होते. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि पुणे पीपल्स को-ऑप. बँक यांच्या वतीने कसबा पेठेतील लालमहाल आवारात सलग १२ तास अखंड कीर्तनमालेचे आयोजन करण्यात आले होते. लालमहालाचे सुरक्षारक्षक संजय आंबवले, प्रबोधिनीचे हेमंतराजे मावळे, प्रा. संगीता मावळे, जनार्दन रणदिवे या वेळी उपस्थित होते.
प्रभात तरुण मित्र मंडळ आणि करण ग्रुप, डेक्कन जिमखाना नागरिक समिती यांच्या वतीने गोपाळ कृष्ण गोखले चौकात राजगिरा लाडू, बिस्किटे, भेळ, पाण्याच्या बाटल्या वाटण्यात आल्या. अपूर्व सोनटक्के, केतकी देशपांडे, बाळासाहेब गिराम, किमया ढेकणे, रंजना नाईक, सुवर्णा ऋषी, प्रिया रानडे या वेळी उपस्थित होते.मार्केट यार्डातील सुमारे ४० सभासदांच्या दुकानांत वारकऱ्यांसाठी चहापाणी, अल्पोपाहार, भोजन, स्वच्छतागृहे आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली. मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिरासह खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आल्याची माहिती दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी दिली.
शिव महोत्सव समिती, साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर मंडळ यांच्या वतीने सर्वधर्मीय अभिवादन दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वधर्मीय धर्मगुरू, आणि सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत दिंडीची सुरुवात झाली. मंडळाचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर, शिवानी माळवदकर, डॉ. कल्पना बळीवंत, विठ्ठल गायकवाड, आबेदा इनामदार आदी उपस्थित होते. बहुजन विकास आघाडीच्या वतीने वारकऱ्यांसाठी ११०० राजगिरा लाडवांचे वाटप करण्यात आले. धनंजय घोलप, सनी रायकर, खाजीभाई शेख, मोहम्मद प्यारे हकिम, हेमंत मोहिते, प्रकाश देशपांडे या वेळी उपस्थित होते. पोलीस मित्र संघटनेच्या वतीने वारकऱ्यांना पिण्याचे पाणी आणि फराळाचे वाटप करण्यात आले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, राजेश बनसोड, चंद्रशेखर कपोते या वेळी उपस्थित होते.
भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक १८ आणि एकता सेवा प्रतिष्ठानाच्या वतीने महर्षीनगर येथे वारकऱ्यांसाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रतिष्ठानाचे अध्यक्ष गणेश शेरला, सारिका जैन, मनीषा शहा या वेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व्यापारी उद्योग सेलच्या वतीने राजगिरा लाडू आणि पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. विक्रम दौंडकर, राहुल दौंडकर, हर्षद जाधव, सुजल शहा या वेळी उपस्थित होते.
वारकऱ्यांची साधू वासवानी मिशनला भेट
वारकऱ्यांनी पुण्यातील मुक्कामात साधू वासवानी मिशनला भेट दिली. त्यांनी साधू वासवानी व दादा वासवानी यांच्या पवित्र समाधिस्थळी भक्तिभावाने वंदन केले, अभंग गायले. मिशनकडून प्रत्येक वारकऱ्याला उपवासाच्या दिवशी उपयोगी ठरेल, असे साहित्य देण्यात आले.