पुणे : पुणे महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्ययावत माहिती मिळावी, तसेच शिक्षणामध्ये त्याचा वापर व्हावा, यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली ‘ई-लर्निंग यंत्रणा’ बंद पडल्याचे उघडकीस आले आहे. महापालिकेची प्रत्येक शाळा ऑनलाइन पद्धतीने जोडली जावी, यासाठी पालिकेने ई-लर्निंग यंत्रणा उभारली होती. यासाठी सुमारे २० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सध्या ही यंत्रणा बंद असल्याची कबुली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी दिली.

पुणे शहरात महापालिकेच्या विविध माध्यमांच्या २६५ पेक्षा अधिक शाळा आहेत. या शाळांमध्ये गरीब आणि गरजू कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे एक लाखापेक्षा अधिक आहे. महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. सात ते आठ वर्षांपासून ई लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी महापालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला आहे.

महापालिकेच्या सर्व शाळांमधील वर्गखोल्यांमध्ये टीव्ही संच (स्क्रीन), तसेच शाळांसाठी संगणक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. काही ठिकाणी स्टुडिओदेखील उभारण्यात आले आहेत. मात्र, सध्या ही यंत्रणा वापरली जात नसून, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांनीदेखील या माहितीला दुजोरा दिला.

ते म्हणाले, ‘शिक्षण विभागाचा आढावा घेण्यासाठी गेल्या आठवड्यात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी ई-लर्निंग यंत्रणा बंद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही यंत्रणा नक्की का बंद आहे, त्यामध्ये अडचणी काय आहेत, याची माहिती घेतली जाईल.’

‘महापालिकेच्या शाळांमध्ये मोफत इंटरनेट सुविधा देण्याच्या बदल्यात महापालिकेने मोबाइल कंपन्यांना केबल टाकण्यासाठी शहरात रस्ते खोदाई करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर या कंपन्यांनी त्यांची कामे करून घेतली. मात्र, महापालिकेच्या शाळांमध्ये मोफत इंटरनेट सेवा दिली नसल्याने ई-लर्निंग यंत्रणा बंद पडली आहे का, याचीही माहिती घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.