पुणे :महापालिका शाळांतील ई लर्निंग प्रकल्प गेल्या तीन वर्षांपासून ठप्प पडला असून हा प्रकल्प सुरू व्हावा, यासाठी महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचा चित्र पाहायला मिळत आहे.
पुणे शहरातील महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी काही वर्षापूर्वी ई-लर्निंग यंत्रणा महापालिकेच्या शाळांमध्ये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी अनेक शाळांमध्ये महापालिकेने लाखो रुपयांचा निधी खर्च करून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षापासून ई-लर्निंगसाठी आवश्यक असलेल्या खर्चाला मान्यता न देण्याचे धोरण महापालिकेने स्वीकारले असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
सुरुवातीच्या काळात खाजगी संस्थेच्या मदतीने महापालिकेच्या काही शाळांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात आला. त्यानंतर महापालिकेच्या जवळपास सर्वच २६५ शाळांमध्ये ई लर्निंगची व्यवस्था उभारण्यात आली. शाळेतील सर्व वर्ग खोल्यांमध्ये स्क्रीन बसविण्यात आले असून शिक्षण मंडळाच्या मुख्य कार्यालयाद्वारे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दृकश्राव्य स्वरूपात शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यात आले.
देशात चार ते पाच वर्षापूर्वी (२०२०-२१ मध्ये) आलेल्या करोनाच्या लाटेमुळे शाळा बंद ठेवण्यात आल्याने हा ई-लर्निंग प्रकल्प बंद राहिला. दरम्यान या कालावधीतच इंटरनेट सेवा खंडित झाल्यानंतर तेव्हापासून ई लर्निंग बंद झाले. गेल्या अनेक वर्षापासून हा प्रकल्प बंद असून, तो सुरू करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची टीका केली जात आहे. महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती असतानाही हा प्रकल्प कार्यान्वित होऊ न शकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महापालिकेच्या २६५ शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गरीब कुटुंबातील असतात. या शाळांमध्ये जवळपास एक लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इंटरनेटच्या युगात आता एआय तंत्रज्ञान आले असून, दररोज नवीन माहिती समोर येत आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेला महापालिकेचा ई लर्निंग प्रकल्प बंद पडल्याने महापालिका प्रशासनाला याकडे लक्ष देण्यास कधी वेळ मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे.
याबाबत महापालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रदीप चंद्रन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘ई लर्निंग शाळा सुरू करण्याबाबत प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे. इंटरनेट सुविधा पुरविण्यासाठी बीएसएनएल आणि जिओ या कंपनीशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ज्या शाळांमध्ये यंत्रणा तयार आहे, तेथे लवकरात लवकर ई लर्निंग सुरू करण्यात येईल. महापालिका आयुक्तांनी वॉर रुमची स्थापना केली आहे. त्यामध्ये या ई लर्निंग उपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.’
महापालिकेच्या शाळेत ई-लर्निंग यंत्रणा उभारण्यात येऊ नये, महापालिकेला त्याची देखभाल करणे जमणार नाही, अशी शंका प्रकल्प सुरू करतानाच उपस्थित करण्यात आली होती. मात्र, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी हट्टाने हा प्रकल्प सुरू केला. ज्या अधिकाऱ्यांनी यामध्ये पुढाकार घेतला. त्यांच्या पगारातून हा खर्च वसूल करावा.- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच