राज्यात शासकीय स्तरावर ७५ हजार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबत उद्योग क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आणि छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>चांदणी चौकातील उड्डाणपुलाची कामे वेगाने पूर्ण करा ; जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांचे आदेश

जिल्हाधिकारी कार्यालय येथे विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, कोल्हापूरचे परेश भागवत यावेळी उपस्थित होते. राज्यातील युवकांना रोजगार देण्यासाठी रिक्त पदे भरण्यासोबत आवश्यक नवी पदे निर्माण करण्याच्या सूचना विविध विभागांना देण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात एकाचवेळी ६ ठिकाणी अशा स्वरूपाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील २ हजार ३३ उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येत आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा >>>विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी सापडली शिवकालीन तोफ, लवकरच किल्ल्यावर विराजमान होणार

पाटील म्हणाले की, बेरोजगारी दूर करणे, चांगले, अनुभवी, कुशल मनुष्यबळ प्रशासनात आणणे आणि राज्याच्या प्रगतीला गती देणे हा यामागचा उद्देश आहे. कायद्याची आणि शासनाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी प्रशासनाची आहे. नवनियुक्त उमेदवारांनी क्षमतेने काम करीत प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देण्याचे कार्य करावे. राव म्हणाले, राज्य शासनाने एका वर्षात ७५ हजार युवकांना रोजगार देण्याचा ‘महासंकल्प’ केला असून त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे विभागामध्ये ऊर्जा, परिवहन आणि ग्रामविकास विभागात एकूण ३१६ पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात येत आहे.

हेही वाचा >>>पुणे : संगणक अभियंत्याची साडेअकरा लाखांची फसवणूक ; गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक

३१६ उमेदवारांना नियुक्तीपत्रे
चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले. पुणे विभागात ऊर्जा विभागाअंतर्गत पुणे वीज वितरण कंपनी ६०, कोल्हापूर वीज वितरण कंपनी १०४, बारामती वीज वितरण कंपनी १४३, पुणे वीज पारेषण कंपनी १ असे एकूण ३०८, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाअंतर्गत पुणे कार्यालयात ३ आणि कोल्हापूर जिल्हा परिषद येथे ५ असे एकूण ३१६ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Efforts are being made to create large scale employment opportunities in the industrial sector chandrkant patil pune print news amy
First published on: 03-11-2022 at 14:19 IST