पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएच. डी. करीत असलेल्या सर्पमित्र विद्यार्थ्याने तस्कर जातीच्या सर्पासह, त्याच्या आठ नवजात पिलांना नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले. विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागात पीएच. डी. करणारे महेश बिलास्कर सर्पमित्र म्हणूनही काम करतात.

दि. ६ ऑगस्ट रोजी दुपारी विद्यापीठाच्या परिसरातून तस्कर (कॉमन ट्रिंकेट) जातीच्या बिनविषारी सापाची सुटका करण्यात आली. त्या वेळी सापाच्या पोटात काही तरी असल्याचे जाणवले. तपासणीनंतर पोटात अंडी असल्याचे आढळले. त्यामुळे साप नैसर्गिक अधिवासात न सोडता घरात सुरक्षित ठिकाणी ठेवला. सायंकाळी सापाने आठ अंडी दिली. अंडी दिल्यानंतर सापाला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. त्यानंतर अंडी सुरक्षित आणि शास्त्रीय पद्धतीने उबविण्यात आली.

हेही वाचा – पुणे : शुभेच्छा दिवाळीच्या, लक्ष्य लोकसभेचे! माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांची फलकबाजी

बिलास्कर यांनी ६५ दिवस सापाच्या अंड्यांची काळजी घेऊन ती शास्त्रीय पद्धतीने उबविली. सापाने नैसर्गिक ठिकाणी अंडी घातली असती, तर त्यातील काही अंडी खराब होण्याची किंवा पक्ष्यांनी खाण्याची शक्यता होती. त्यांनी अंडी उबविण्यासाठी एका बादलीत कोकोपीट टाकून, पुरेशी आर्द्रता आणि उबदारपणा निर्माण केला. दर पाच-सात दिवसांनी अंड्यांची तपासणी केली. ६५ दिवसांनी पिले बाहेर येण्याची प्रक्रिया सुरू झाली. जन्मावेळी नवजात पिले सरासरी दहा इंच लांबीची होती. ही सर्व पिले नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आली.

हेही वाचा – वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी व्यवस्थापन, एनआरआय कोट्याचे कमाल शुल्क जाहीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्लू ट्रॅप ठरतोय सर्पासाठी जीवघेणा

दहा दिवसांपूर्वी बाणेर-सूस रस्त्यावरील महिला उन्नती केंद्रातून फोन आला. उंदरासाठी लावलेल्या ग्लू ट्रॅपवर पहिल्यांदा उंदीर चिकटून बसला होता. हा उंदीर खाण्यासाठी आलेला नागही ग्लू ट्रॅपला चिकटून बसला होता. महेश बिलास्कर आणि सर्पमित्र गणेश माने यांनी त्या नागाला सुखरूप सोडवले. नागाच्या कातडीला ग्लू ट्रॅपचा चिकट द्रव चिकटला होता. त्यामुळे नागाला नैसर्गिक अधिवासात सोडले नाही. नागाला घरी आणून सुकी माती टाकलेल्या आणि छिद्र असलेल्या प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवले. एक उंदीरही खायला दिला. कातडीला डिंक लागल्यामुळे नागाने दोन दिवसांत कात टाकण्याची प्रक्रिया सुरू करताच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. नागावर उपचार सुरू असताना नाशिक येथील पशुवैद्यक संजय गायकवाड यांचा ऑनलाइन सल्ला घेण्यात आला. उंदरांसाठी लावण्यात येणारा ग्लू ट्रॅप सापांसाठी जीवघेणा ठरतो आहे. त्यामुळे अत्यंत निकडीच्या वेळीच ग्लू ट्रॅप लावावा, असे आवाहन बिलास्कर यांनी केले आहे.