कोथरूडमध्ये मागील महिन्यात निलेश घायवळ टोळीतील दोघांनी गोळीबार केल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. तर त्या घटनेनंतर निलेश घायवळ हा परदेशात पसार झाला. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी निलेश घायवळ याला भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते सहकार्य करित असल्याचा आरोप केला. त्या संदर्भातील अनेक फोटो देखील समोर आणले. त्यावरून मागील आठवड्याभरापासून रविंद्र धंगेकर हे चंद्रकात पाटील यांच्यावर नवनवीन आरोप करीत टीका करित होते.
या सर्व घडामोडी दरम्यान रविंद्र धंगेकर यांच्या मुलाचे गुंड गजा मारणेसोबतचे फोटो समोर आले. त्यावरून पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू होण्यास सुरुवात झाली होती. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविंद्र धंगेकर यांना समज द्यावी, अशी मागणी भाजपच्या स्थानिक नेत्याकडून करण्यात आली होती. त्याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यात आज एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी रविंद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी दोघांमध्ये काही मिनिटे चर्चा झाली.
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले, महायुतीमध्ये दंगा नको, हे मी रविंद्र धंगेकर यांना सांगितले आहे. पुणे शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, सर्वसामान्य जनतेला कुठलाही त्रास होऊ नये. पुण्यातील मुली, महिला तसेच नागरिक यांना निर्भयपणे फिरता आले पाहिजे. कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे, अशी मागणी रविंद्र धंगेकर यांनी केली आहे. पण मी तुम्हाला यावर एकच सांगू इच्छितो की, गुन्हेगाराला क्षमा नाही. गुन्हेगार कोणीही असू द्या, त्याला पाठीशी घातलं जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.