पुणे : नवले पूल परिसरातील नाल्याच्या पात्रात पडल्याने ज्येष्ठ महिला वाहून गेल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. अग्निशमन दलाकडून महिलेचा शोध घेण्यात येत आहे.शोभा मनोहर महिमाने (वय ६५, दर्शन पार्क, फुरसुंगी, हडपसर) असे वाहून गेलेल्या महिलेचे नाव आहे. त्या कोल्हापूरला नातेवाईकांकडे गेल्या होत्या.
गुरुवारी रात्री शहर परिसरात पाऊस झाला. बसने त्या मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर उतरल्या. नवले पूल परिसरातून त्या रस्ता ओलांडत होत्या. रस्ता ओलांडून त्या रिक्षाथांब्याकडे निघाल्या होत्या. त्या वेळी तेथून वाहणाऱ्या पाण्यात त्या पडल्या. पावसामुळे नाल्याला पूर आला होता. नाल्यात पडून त्या वाहून गेल्या, अशी माहिती अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी दिली.
नवले पूल परिसरातील नाल्याजवळ गुरुवारी रात्री शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, अंधार असल्याने शोधमोहिमेत अडथळे आले. महिलेची चप्पल नाल्याजवळ सापडली. शुक्रवारी सकाळी या भागात पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. सिंहगड रस्त्यावरील प्रयेजा सिटीपर्यंत नाला जातो. जवानांनी नाल्याच्या परिसरात शोध घेतला. मात्र, त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.