साडेतीन लाखांवर वीजग्राहक अंधारात

पुणे : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (पीजीसीआयएल) अतिउच्चदाब ४०० केव्ही शिक्रापूर ते तळेगावच्या चारपैकी दोन वीजवाहिन्यांमध्ये गुरूवारी सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्याचा परिणाम म्हणून चाकण एमआयडीसीसह पुणे शहरातील नगर रस्ता विभाग आणि पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी आणि भोसरी विभागातील सुमारे ३ लाख ५५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. रात्री साडेदहानंतर या सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी ‘माझे पुणे, स्वच्छ पुणे’ मोहीम; पीपीसीआर, पुणे महापालिकेचा संयुक्त उपक्रम

पीजीसीआयएलच्या शिक्रापूर ते पीजीसीआयएल तळेगाव अतिउच्चदाब ४०० केव्ही वीजवाहिन्यांच्या चारपैकी दोन वाहिन्यांमध्ये गुरुवारी तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे महापारेषण कंपनीच्या ४०० केव्ही चाकण, २२० केव्ही चिंचवड, २२० केव्ही उर्से, २२० केव्ही चाकण, १३२ केव्ही चाकण, १३२ केव्ही खराडी या अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद झाला. सुमारे ३९६ मेगावॅट विजेचा पुरवठा बंद झाल्यामुळे पुणे शहरातील प्रामुख्याने खराडी, वडगाव शेरी, विमाननगर, येरवडा, धानोरी परिसरातील सुमारे सव्वा लाख  वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. त्याबरोबरच पिंपरी गाव, चिंचवड, पुनावळे, वाल्हेकरवाडी, वाकड, ताथवडे, किवळे, रावेत, थेरगाव परिसर आणि संपूर्ण प्राधीकरणासह आकुर्डीमधील ५० टक्के परिसरातील २ लाख ३० हजार अशा एकूण ३ लाख ५५ हजारांवर ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.

हेही वाचा >>> पुणे : फेरीवाला दिसताच रेल्वेचा दंडुका! दीड महिन्यांत ७४ जणांवर कारवाई

चाकण एमआयडीसीमधील उच्च आणि लघुदाबाच्या सुमारे पाच हजार औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. १३२ केव्ही अतिउच्चदाब चाकण उपकेंद्रातून एका वीजवाहिनीद्वारे चाकण शहराचा वीजपुरवठा सुरू ठेवण्यात आला. या पॉवर ग्रीडच्या अतिउच्चदाब ४०० केव्ही वीजवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या अदानी कंपनीकडून बिघाड दुरुस्त करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. रात्री साडेदहानंतर महापारेषणच्या सर्व अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला. त्यानंतर महावितरणच्या उपकेंद्रांचा टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरू करण्यात आला. खंडित असलेला सर्व भागातील वीजपुरवठा रात्री साडेअकरानंतर सुरळीत झाला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electricity supply disrupted in several areas of pune and pimpri chinchwad due fault in high voltage cable pune print news vvk 10 zws
First published on: 18-05-2023 at 23:06 IST