पुणे : अधिकारी, कर्मचारी भरती करावी, पाच दिवस काम, नव्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करावी, निवृत्तिवेतन योजना अद्ययावत करावी अशा विविध मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया या दोन बँकांच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (२७ जानेवारी) संपाची हाक दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या मागण्यांसाठी नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील बीओएमच्या प्रादेशिक कार्यालयावर सोमवारी सायंकाळी मोर्चा काढण्यात आला. तसेच मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता मुंबई येथील प्रादेशिक कामगार आयुक्तांकडे बैठक आयोजित केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून जागा भरण्यात आलेल्या नाहीत, तसेच मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून जनधन, जीवनज्योती, जीवन सुरक्षा, फेरीवाले स्वनिधी, मुद्रा अशा केंद्राच्या विविध योजनांची अनेक कामे बँकांकडे दिली आहेत. तसेच सर्व प्रकारच्या सबसिडी बँकांमार्फत वाटण्यास सुरुवात केली.

हेही वाचा >>> पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, २१ ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग, नदीवरील पूल

कामगार आणि ज्येष्ठ नागरिक बँकांच्या विविध ई-सेवा वापरण्यास इच्छुक नसतात किंवा बँकेत जाऊन प्रत्यक्ष व्यवहार करण्यावर या घटकांचे प्राधान्य असते. या कामकाजामुळे बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कामकाज प्रचंड वाढले आहे. दररोज बँक कर्मचाऱ्यांना बँकेची वेळ संपल्यानंतर दोन-तीन तास जादा काम करण्यासाठी बसावे लागत आहे. शनिवार-रविवार कामाला यावे लागते, रजा मिळत नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर शुक्रवारी संपाची हाक देण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशनचे सरचिटणीस देविदास तुळजापूरकर यांनी दिली. दरम्यान, २७ जानेवारीचा संप केवळ बीओएम आणि बीओआय बँकांपुरता मर्यादित असून देशव्यापी असेल. तर, ३० आणि ३१ जानेवारी रोजी सर्व बँका आणि त्यांच्या सर्व कामगार संघटनांनी पुकारला आहे, असेही तुळजापूरकर यांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Employees bank of maharashtra bank of india on strike friday pune print news psg 17 ysh
First published on: 24-01-2023 at 10:11 IST