अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या खडकवासला परिसरातील जांभळी गावात असलेल्या जमिनीवर अतिक्रमण करून खोदकाम केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे यांच्या विरोधात उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत उषा चव्हाण यांचे पुत्र हृदयनाथ दत्तात्रय कडू (वय ५२, रा. पद्मादर्शन सोसायटी, पुणे-सातारा रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. उषा चव्हाण-कडू यांनी जांभळी गावातील जमीन १९९९ मध्ये खरेदी केली होती. १५ मे रोजी जेसीबी यंत्राद्वारे जागेत खोदकाम सुरू असल्याची माहिती कडू यांना मिळाली. त्यानंतर कडू पोलिसांना घेऊन तेथे गेले. तेव्हा त्यांच्या जागेत ४०० फूट लांब, ४ फूट रुंद आणि २ फूट खोल असे चर खोदल्याचे दिसून आले.

त्यांच्या मालकीच्या जागेत वहिवाटीसाठी केलेला रस्ता बंद करण्यात आल्याचे दिसून आले. तसेच तारेचे कुंपण, खांबांची तोडफोड केल्याचे आढळून आले. त्यानंतर कडू यांनी धर्मराज गडदे यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा राजेंद्र धनकुडे यांनी अतिक्रमण केल्याची माहिती कडू यांना मिळाली. कोणतीही परवानगी न घेता आमच्या जागेत बेकायदा प्रवेश करून चर खोदण्याचे काम केल्याचे कडू यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत राजेंद्र धनकुडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी माझ्याविषयी बदनामीकारक मजकूर समाजमाध्यमावर प्रसारित केला केला आहे तसेच माझ्यावर चुकीने गुन्हा दाखल केला आहे. जांभळी गावात चव्हाण यांच्या जमिनीशेजारी माझी जमीन आहे. माझ्या जमिनीत गुरांचा गोठा असून या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये गाई-म्हशींना पाणी मिळत उपलब्ध होत नसल्याने मी कायदेशीररित्या शासनाकडून परवानगी घेतली. त्यानुसार मी चव्हाण यांच्या जागेतून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केले. जलवाहिनीचे काम पूर्ण केल्यानंतर खोदाकाम केलीली जागा पूर्ववत करून देणार होतो. याबाबत त्यांना तसे मी सांगितले होते. गाई, म्हशींसाठी पाणी घेऊन जाण्यासाठी चव्हाण टोकाचा विरोध करतील, याची जाणीव मला नव्हती”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चव्हाण यांनी अतिक्रमण केल्याचा आरोप करून माझ्यावर गुन्हा दाखल केला. ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून त्यांच्याविषयी मला आदर आहे. मात्र, द्वेषापोटी आरोप करून राजकीय पदाचा राजीनामा मागणे गैर आहे. चव्हाण यांच्या जमिनीखालून शेती, गुरांसाठी जलवाहिनी टाकण्याची परवानगी शासनाने दिली होती, असे धनकुडे यांनी नमूद केले.