‘गिरिप्रेमी’ संस्थेतर्फे सुरू असलेल्या ‘एव्हरेस्ट-ल्होत्से’ मोहिमेअंतर्गत उद्या (दि. १२) पहाटे तीन वाजता अंतिम चढाई सुरू होत असल्याचे या मोहिमेचे नेते उमेश झिरपे यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प येथून कळविले आहे.
‘गिरिप्रेमी’ संस्थेतर्फे यंदा ‘एव्हरेस्ट-ल्होत्से’ मोहिमेचे आयोजन केले आहे. उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली आनंद माळी, गणेश मोरे, आशिष माने, टेकराज अधिकारी आणि अजित ताटे हे गिर्यारोहक या मोहिमेत सहभागी झाले आहेत. गेल्या महिन्यात बेस कॅम्प लावल्यानंतर हे सदस्य नुकतेच कॅम्प ३ पर्यंत सरावाची चढाई करून आले. या चढाईनंतर हवामानाचा अंदाज घेत आता अंतिम चढाईला उद्यापासून सुरुवात केली जाणार आहे. उद्या पहाटे ३ वाजता ‘गिरिप्रेमी’चे हे गिर्यारोहक ‘कॅम्प १’च्या दिशेने चढाईस सुरुवात करतील. यानंतर ‘कॅम्प २’, ‘कॅम्प ३’ आणि साउथ कोल असे करत अंदाजे १५ किंवा १६ मे रोजी हे गिर्यारोहक ‘एव्हरेस्ट’च्या शिखरावर पोहोचतील असे झिरपे यांनी सांगितले.