महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकांमधून जीवनाच्या सर्वच क्षेत्रात चांगले नेतृत्व घडेल, असे मत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी शनिवारी व्यक्त केले. निवडणुका होऊच नये असे म्हणणे हा पलायनवाद ठरेल असे सांगतानाच हे मत व्यक्त करणाऱ्यांनी आपले वय झाले हे मान्य करावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
नगरसेवक दिलीप काळोखे आणि विद्यापीठ विकास मंच यांच्यातर्फे ‘महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुका : सद्यस्थिती आणि भवितव्य’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. भाजप शहराध्यक्ष अनिल शिरोळे, आमदार गिरीश बापट, चंद्रकांत पाटील, माजी आमदार उल्हास पवार, पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता डॉ. सुधाकर जाधवर, सरहदचे संजय नहार, नगरसेवक किशोर शिंदे, मंचाचे प्रांतप्रमुख प्रा. ए. पी. कुलकर्णी, अभाविपचे प्रांतमंत्री विवेकानंद उजळंबकर चर्चासत्रामध्ये सहभागी झाले होते.
आव्हानच स्वीकारायचे नसेल तर, सर्वच निवडणुका बंद करून टाका. विरोध विद्यार्थी निवडणुकीला आहे की विद्यार्थ्यांच्या सहभागाला हे आधी निश्चित करावे लागेल असे मुद्दे उपस्थित करीत तावडे यांनी निवडणुकीचे समर्थन केले. उल्हास पवार म्हणाले, महाविद्यालयामध्ये निवडणुका झाल्या पाहिजेत अशी पक्षाची भूमिका मांडेन. पण, अशा निवडणुका न झालेल्याच बऱ्या असे माझे अंतर्मन मला सांगते.
अंकुश काकडे म्हणाले, हुशार विद्यार्थ्यांकडे नेतृत्वगुण नसतात. त्याला राजकारणामध्येही रस नसतो. पूर्वी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालणाऱ्या बहुतांश विद्यार्थी संघटना केवळ परप्रांतीय मुलांना प्रवेश मिळवून देण्यातून लाखो रुपये कमावण्याचा धंदा करीत आहेत. भावी पिढी घडविणाऱ्या महाविद्यालयांमध्ये केवळ शिक्षण असावे. तेथे निवडणुका असूच नयेत, असे मत अनिल शिरोळे यांनी व्यक्त केले. तर, सुधारणा घडवून अशा निवडणुका झाल्या पाहिजेत, ही भूमिका गिरीश बापट यांनी मांडली.