पुणे : बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र मिळवल्या प्रकरणी कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घायवळ याच्याविरुद्ध आतापर्यंत चार गुन्हे दाखल झाले असून, बनावट पारपत्र मिळवून तो युरोपात गेल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली आहे.

या प्रकरणी नीलेश बन्सीलाल घायवळ (वय ४९, रा. संत ज्ञानेश्वर काॅलनी, शास्त्रीनगर, कोथरूड), तसेच त्याला बनावट पारपत्र काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक माेहन जाधव यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक माने तपास करत आहेत.

कोथरूड भागात किरकोळ वादातून एका तरुणावर गोळीबार प्रकरणात घायवळ याच्यासह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. तो ९० दिवसांच्या व्हिसावर स्वित्झर्लंडला गेल्याचे समोर आले आहे. अहिल्यानगरमधून त्याने ‘तत्काळ’ पारपत्र मिळविले आहे. या पारपत्र प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून तपास करण्यात आला.

घायवळने बनावट कागदपत्रांद्वारे अहिल्यानगर येथून पारपत्र मिळवले. त्याने ९० दिवसांचा व्हिसा मिळविल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली आहे. घायवळ याला अटक करण्यासाठी पोलिसांनी ‘लूक आऊट’ नोटीस बजावली आहे .घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ असे नाव त्याने पारपत्र मिळवताना वापरले आहे. पुणे पोलिसांचे पथक अहिल्यानगरमध्ये गेले. त्याने पारपत्र मिळविण्यासाठी दिलेला पत्ता खोटा असल्याचे लक्षात आले.

घायवळ याचे कोथरूडमधील शास्त्रीनगर भागात घर आहे. त्याचे घर आणि कार्यालयाची झडती कोथरूड पोलिसांनी शनिवारी (४ ऑक्टोबर) घेतली होती. घरातून पोलिसांनी दोन काडतुसे, चार पुंगळ्या जप्त केल्या. पोलिसांनी घायवळ याच्या घरातून धाराशिव, पुणे, मुळशी, जामखेड येथील जमिनी संदर्भातील खरेदीखत, साठेखतासह अन्य कागदपत्रे, तसेच दहा तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणी घायवळविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम १९५१ चे कलम ५, ७, २५ (१), २७ (२) अन्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट कागदपत्रांद्वारे नीलेश घायवळने पारपत्र मिळविल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी घायवळ याच्याविरुद्ध पासपोर्ट ॲक्ट, आधार कार्ड ॲक्ट तसेच फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. घायवळ याला पारपत्र मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांविरुद्ध पोलिसंनी गुन्हा दाखल केला आहे.- संभाजी कदम, पोलीस उपायुक्त, परिमंडळ तीन