पुणे : नववर्षाच्या रात्री किरकोळ वादातून कसबा पेठेत दोन युवकांवर कोयत्याने वार करून पसार झालेल्या आरोपींना फरासखाना पोलिसांनी गजाआड केले.
पवन अशोक जाधव (वय २१), आयन नासीर शेख (वय १९), आदित्य रवी भुजबळ (वय २२, तिघे रा. कसबा पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. यश पिंगळे (वय १८), केदार कुंभार (वय १८, दोघे रा. कसबा पेठ) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. नववर्षाच्या रात्री यश आणि केदार सोसायटीच्या आवारात मोबाइलवर गेम खेळत होते. त्या वेळी आरोपी पवन, आयन, आदित्य सोयायटीच्या आवारात थांबले होते. त्या वेळी तू रोहित दरेकरचा मित्र आहे का? अशी विचारणा आरोपींनी दोघांकडे केली. यश, केदार यांना मारहाण करून आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले.
त्याच वेळी रोहित दरेकर सोसायटीच्या आवारातून निघाला होता. आरोपींनी त्याला शिवीगाळ करून त्याचा पाठलाग केला. रोहित तेथून पळाला. तेव्हा आरोपींनी त्याला कोयता फेकून मारला. रोहितवर कोयत्याने वार करून आरोपी पसार झाले. पसार झालेल्या आरोपींचा माग पोलिसांकडून काढण्यात येत होता. आरोपींची माहिती पोलीस नाईक तुषार खडके यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिघांना अटक केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संतोष शिंदे, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, रिजवान जिनेडी, गणेश दळवी, तुषार खडके, प्रवीण पासलकर, वैभव स्वामी आदींनी ही कारवाई केली.