पुण्यातील धानोरी येथे अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निमूर्लन पथकावर जमावाने हल्ला केल्याची घटना आज (मंगळवार) घडली. अतिक्रमण निरीक्षक अनिल परदेशी आणि जेसीबी चालक सुभाष कांबळे हल्ल्यामध्ये जखमी झाले आहेत. दरम्यान, यासंदर्भात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सुरू करण्यात आली आहे.

शहरातील प्रमख रस्ते, चौक आणि उपरस्त्यांवरील विविध प्रकारची अतिक्रमणे काढण्याचे आदेश महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी दिले आहेत. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने विविध भागात कारवाई सुरू केली आहे. धानोरी येथील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी अतिक्रमण विभागाचे पथक आज (मंगळवार) दाखल झाले. पथकाला कारवाई करण्यास विरोध करण्यात आला. त्यातून महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबरच बाचाबाची सुरू झाली. नागरिकांनी जेसीबी आणि अधिकाऱ्यांवर दगडफेक सुरू केली. यात अनिल परदेश आणि सुभाष कांबळे जखमी झाले, अशी माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हल्ल्यानंतर तूर्त कारवाई थांबविण्यात आली आहे. मात्र उद्या (बुधवार) सकाळी कारवाई केली जाईल, असेही माधव जगताप यांनी सांगितले आहे.