पुणे : संभाव्य दुर्घटना विचारात घेऊन पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि वाहन यंदाही पालखी सोहळ्यात सहभाग होणार आहे. अग्निशमन दलाचे जवान पालखी सोहळ्यात सहभागी होणार असून, श्रीक्षेत्र पंढरपूरपर्यंत जवान आणि वाहन तैनात राहणार आहे.
पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होतात, आग लागणे, तसेच एखादी दुर्घटना घडल्यास त्वरीत मदत उपलब्ध व्हावी, तसेच ग्रामीण भागात मदत मिळण्यास विलंब होत असल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी यंदाही श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान सहभागी होणार आहेत. अग्निशमन दलाचे एक वाहन, एक अधिकारी आणि सहा जवान गुरुवारी श्रीक्षेत्र आळंदीत दाखल झाले. आळंदीतून जवान पालखी सोहळ्यात सहभागी झाले असून, श्री क्षेत्र पंढरपूरपर्यंत जवानांचे पथक तैनात राहणार आहे, अशी माहिती प्रभारी अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे यांनी दिली.
श्री ज्ञानेस्वर महाराज आणि श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शुक्रवारी शहरात दाखल झाला. विश्रांतवाडी, खंडोजीबााबा चौक, तसेच पालखी मुक्कामी नाना-भवानी पेठेत अग्निशमन दलाचे जवान आणि बंब तैनात करण्यात आला आहे. पालखी सोहळा शहरातून मार्गस्थ झाल्यानंतर हडपसर भागात अग्निशमन दलाचे जवान तैनात राहणार आहेत असे त्यांनी सांगितले.
आपत्कालिन परिस्थितीत संपर्क साधावा
पुणे ते श्रीश्रेत्र पंढरपूर मार्गावर पालखी सोहळ्यात आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाल्यास अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे (मोबाइल क्रमांक – ८२०८९५६३१६) आणि जवान अजितकुमार शिंदे (मोबाइल क्रमांक- ८८०५९८८०३९), राजू शेलार (मोबाइल क्रमांक ९९२२४२६६००) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे यांनी केले आहे.