पुणे : ‘महामेट्रो’च्या स्वारगेट ते कात्रज या मार्गिकेच्या साडेपाच किलोमीटर अंतरावरील मार्केट यार्ड, पद्मावती व कात्रज या तीन मेट्रो स्थानकांच्या प्रस्तावित भूमिगत मेट्रो मार्गास केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे. मात्र, बालाजीनगर मेट्रो स्थानकाबाबत कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर बालाजीनगर आणि नव्याने सहकारनगर-बिबवेवाडी या स्थानकाबाबत व्यवहार्यता तपासून पाच स्थानकांबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सोमवारी पुणे मेट्रो प्रशासनाला केल्या आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या मेट्रो मार्गिकेसाठी निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरुवात करण्यात येईल, असेही स्पष्ट केले. राज्यमंत्री मिसाळ यांनी पुणे मेट्रो कार्यालयात मेट्रो कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘पुणे मेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, संचालक अतुल गाडगीळ, संचालक विनोदकुमार अग्रवाल, कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे उपस्थित होते.

हेही वाचा – पुणे-नाशिक रेल्वे जुन्याच मार्गावरून हवी, विरोधकांसह महायुतीच्या लोकप्रतिनिधींचीही मागणी

मिसाळ म्हणाल्या, ‘महामेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज या प्रस्तावित मार्गिकेचे काम हाती घेण्यात आले आहे. नागरिकांच्या आग्रहास्तव या मार्गिकेवर बालाजीनगर (भारती विद्यापीठ समोर) येथील स्थानकाला मंजुरी मिळाली नाही. त्यातच या स्थानकाबरोबर सहकारनगर-बिबवेवाडी या ठिकाणी नागरिकांकडून स्थानकाबाबत मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर साडेपाच किलोमीटर अंतरात पाच स्थानके होणे शक्य आहे किंवा नाही, यासाठी मेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. तसेच, याबाबतची व्यवहार्यता, वाढणारा आर्थिक खर्च आदी नियोजनाच्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत.’

दरम्यान, वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) या दोन मेट्रो मर्गिकांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे असून, मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम मान्यता मिळेल. याशिवाय, खडकवासला ते खराडी आणि माणिकबाग-वारजे-एसएनडीटी असे दोन मेट्रो मार्गाचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवले असून, तज्ज्ञ समितीच्या अभ्यासानंतर निर्णय होईल, असा विश्वास मिसाळ यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – Guillain Barre Syndrome: पुण्यात दुर्मिळ गुइलेन बॅरे सिंड्रोमचे २२ संशयित रुग्ण; ‘या’ भागातले सर्वाधिक संशयित!

प्रमुख मुद्दे

  • स्वारगेटच्या बहुद्देशीय वाहतूक केंद्रासोबत बस स्थानक जोडणार
  • महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) प्रस्ताव पाठविण्यासाठी मेट्रोला सूचना
  • शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ‘ट्रान्सपोर्ट मॅपिंग’ करणार
  • शिवाजीनगर मेट्रो स्थानक ते शिवाजीनगर बस स्थानक जोडण्यासाठी प्रयत्न
  • मेट्रो स्थानकांजवळ बस, रिक्षाच्या स्थानकांसाठी प्रयत्न