पुणे : ‘या व्यासपीठावर मी १९९६ मध्ये आले होते. ही संस्था दहा वर्षे टिकेल का अशी माझ्या मनात शंका होती. पण, जर ती टिकली तर मी पुन्हा येथे येईन, असे मी त्यावेळी म्हटले होते. त्यानुसार मी आले आहे,’ हे उद्गार आहेत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि पुदुचेरीच्या माजी राज्यपाल डॉ. किरण बेदी यांचे. ‘तीन दशकांनंतर पुन्हा येथे उपस्थित राहून मला अत्यानंद होत आहे’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या लीला पूनावाला फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या ३० व्या पदव्युत्तर शिष्यवृत्ती वितरण सोहळ्यास डाॅ. किरण बेदी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. संस्थेच्या पहिल्याच पुरस्कार सोहळ्याच्या मुख्य पाहुण्या असलेल्या बेदी यांनी तब्बल ३० वर्षांनंतर पुन्हा त्या मंचावर येऊन इतिहासाची पुनरावृत्ती केली. फाउंडेशनच्या संस्थापक लीला पूनावाला, विश्वस्त फिरोज पूनावाला, फे्रनी तारापोरे, शेर्नाझ एडीबम यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह दूरदृश्य प्रणालीद्वारे माया ठदानी या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. फाउंडेशनच्या तीन दशकांच्या कार्यप्रवासावर आधारित स्मरणिकेचे प्रकाशन किरण बेदी यांच्या हस्ते करण्यात आले.

‘लीला पूनावाला फाउंडेशन एक वटवृक्ष झाला असून हजारो युवतींना बळ देत आहे, जी अभिमानास्पद बाब आहे. ही संस्था कायमस्वरूपी चालत राहील याची मला खात्री आहे’, अशा शब्दांत किरण बेदी यांनी फाउंडेशनच्या कार्याचा गौरव केला. ‘तीन दशकांपूर्वी मी येथे आले तेव्हा फक्त २० मुली होत्या. आणि आज हे कुटुंब १८ हजारांहून अधिक मुलींचे झाले आहे. ही तुमच्या ‘लिला गर्ल्स’ची शक्ती आहे. आता या चळवळीला पुढील अनेक वर्षे चालविण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे,’ असे त्यांनी विद्यार्थिनींना उद्देशून सांगितले.

आमचे ध्येय केवळ शिष्यवृत्तीपुरते मर्यादित नाही. आम्ही आत्मविश्वासी, सक्षम आणि संवेदनशील महिला नेत्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आमच्यावर विश्वास ठेवून आमच्यासोबत चालणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते.लीला पूनावाला, संस्थापक, लीला पूनावाला फाउंडेशन

कार्यक्षेत्राचा विस्तार

लीला पूनावाला फाउंडेशनने गेल्या तीन दशकांत आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार पुण्याबरोबर वर्धा, अमरावती, नागपूर, हैदराबाद आणि बेंगळुरू येथे केला आहे. संस्थेने पदव्युत्तर आणि पदवी शिष्यवृत्तीबरोबरच शालेय मुलींसाठी ‘2morrow 2gether’ हा विशेष कार्यक्रमही सुरू केला आहे. फाउंडेशनने २०३० पर्यंत २५ हजार आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींचे जीवन सकारात्मकपणे बदलण्याचे ध्येय ठेवले आहे. त्याचा परिणाम केवळ मुलींवरच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबांवर आणि समाजावरही होणार आहे.