पुणे : शिवसेनेचे माजी आमदार आणि मावळ तालुक्यातील शिरगाव येथील प्रतिशिर्डीचे मुख्य विश्वस्त प्रकाश देवळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज (२४ सप्टेंबर) रोजी दुपारी २.३० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देवळे हे तत्कालीन शिवसेनेतर्फे १९९६ मध्ये विधान परिषदेवर निवडून गेले होते. शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.
राजकारणाबरोबरच चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात त्यांनी काम केले. नुकताच त्यांना नामदेव शिंपी समाजाचा समाजभूषण पुरस्कार राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आला होता.