पुणे : रेल्वे अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेमुळे चार जणांना जीवदान मिळाले आहे. या महिलेला मेंदूमृत घोषित करण्यात आल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. यामुळे तिचे फुफ्फुस, यकृत आणि दोन मूत्रपिंडे चार रुग्णांना प्रत्यारोपित करण्यात आली.या महिलेला रेल्वे अपघातात गंभीर डोक्याला दुखापत झाली होती. तिला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या रुग्णालयातून व्हेंटिलेटरवर हलवून आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सात दिवस अतिदक्षता विभागात आणि न्यूरो सर्जरी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू होते. सातत्याने स्कॅन, तपासण्या आणि आपत्कालीन उपचार केले गेले. मात्र, मेंदूतील सूज आणि रक्तस्रावामुळे स्थिती बिघडत गेली. अखेर तिला मेंदूमृत घोषित करण्यात आले. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला.

विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीने या अवयववाटपाचा निर्णय घेतला. या महिलेचे हृदय डी. वाय. पाटील हॉस्पिटलमधील रुग्णाला देण्यात आले. तिचे यकृत ज्युपिटर हॉस्पिटलमधील रुग्णाला देण्यात आले. तिचे एक मूत्रपिंड आदित्य बिर्ला हॉस्पिटलमधील रुग्णाला आणि दुसरे मूत्रपिंड सह्याद्री हॉस्पिटलमधील (डेक्कन) रुग्णाला देण्यात आले. या अवयवांचे प्रत्यारोपण वेळेत केल्याने या चार रुग्णांना नवजीवन मिळाले.याबाबत आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटलमधील डॉ. अमित चौधरी म्हणाले, की ही महिला आमच्याकडे सात दिवस दाखल होती. आम्ही तिचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु जेव्हा ते शक्य झाले नाही, तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी इतरांचे प्राण वाचवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या अवयवदानाच्या या निर्णयाने अनेकांना नवजीवन मिळू शकले.

अवयवदानाचे प्रमाण अत्यल्प

भारतामध्ये अद्याप अवयवदानाचे प्रमाण अत्यल्प असून, दर दशलक्ष लोकसंख्येमागे केवळ १ व्यक्ती अवयवदान करते. देशभरात सुमारे ५ लाख रुग्ण प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. हृदय, यकृत, फुफ्फुसे, मूत्रपिंड यांसारखे अवयव, तसेच क्वचित प्रसंगी स्वादुपिंड आणि आतडे यांचे दान केल्याने अनेक रुग्णांना जगण्याची नवीन संधी मिळते. तसेच, डोळे, त्वचा आणि हाडे अशा ऊतकांच्या दानाने प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण होतो.