पिंपरी : आधार कार्डचा आर्थिक गैरव्यवहारासाठी वापर झाला असून, त्याबाबत गुन्हा दाखल झाल्याचे सांगून महिलेची सात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार चिखली येथे घडल्याचे उघडकीस आले.
एका महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी महिलेशी दूरध्वनीद्वारे संपर्क केला. ‘आधार’ विभागातून बोलत असल्याचे दूरध्वनीवरील व्यक्तींनी सांगितले. ‘आधार’ क्रमांक एका आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात वापरला गेला असून, त्याबाबत मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा पाठवण्यात आल्याची भीती महिलेला दाखविली गेली. तसेच, तेथून पोलीस पडताळणी प्रमाणपत्र घेऊन ते ‘आधार’ विभागात जमा करण्यास सांगितले. त्यानंतर एका क्रमांकावर संपर्क करण्यास सांगितले. त्या व्यक्तीने फिर्यादी महिलेची बँक खात्याची, कागदपत्रांची माहिती घेतली.
बँकेतील जमा रक्कम ‘आरबीआय’ला पाठवावी लागेल, असे सांगून महिलेला चार लाख ८७ हजार ५०० रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानंतर महिलेच्या कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेऊन दोन लाख ४० हजार रुपये आरोपींनी त्यांच्या खात्यावर घेतले. महिलेने आरोपींना एकूण सात लाख २७ हजार ५०० रुपये पाठवले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक फडतरे तपास करीत आहेत.