लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : नगर रस्त्यावरील वाघोली भागात असलेल्या पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण हक्क कायदा (आरटीई) कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने शाळेतील लेखापालाने ५३ पालकांकडून पैसे उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पालकांची साडेतेरा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी लेखापालाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विनयकुमार रुपचंद भांडारकर (सध्या रा. मांजरी, मूळ रा. भंडारा)असे गुन्हा दाखल केलेल्या लेखापालाचे नाव आहे. याबाबत शाळेचे सहायक व्यवस्थापक स्वानंद चंद्रकांत कुलकर्णी (वय ४७, रा.वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाघोलीतील उबाळे नगर परिसरात पोदार इंटरनॅशनल स्कूल आहे .आरोपी भांडारकर शाळेत लेखापाल आहे. शासनाच्या आदेशानुसार दुर्बल घटकातील मुलांना ‘आरटीई’अंतर्गत मोफत शिक्षण देण्यात येते. ‘आरटीई’अंतर्गत अर्ज दाखल केल्यानंतर मुलांना घरापासून जवळ असलेली शाळा मिळत नाही. मुलांना घराच्या परिसरातील शाळा मिळावी, यासाठी प्रयत्न करतात. शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी पालक शिफारस, तसेच प्रयत्न करतात.

आणखी वाचा-पुणे: गॅलरीतून उडी मारून वृद्धाची आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी भांडारकर याने पालकांना ‘आरटीई’ कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. त्याने ५३ पालकांकडून रोख,तसेच ऑनलाइन पद्धतीने १३ लाख ६५ हजार रुपये घेतले होते. पालकांनी एप्रिल महिन्यात पैसे दिले होते. त्यानंतर प्रवेश न मिळाल्याने पालकांनी भांडारकर याच्याकडे विचारणा केली. पालकांनी याबाबत शाळेच्या प्रशासनाकडे तक्रार दिली. त्यानंतर शाळेने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. भांडारकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पालीस उपनिरीक्षक राहुल कोळपे तपास करत आहेत.