पुणे : ‘विघ्न हरून प्रत्येकाच्या जीवनात सुखाची पखरण करणाऱ्या गणरायाचे बुधवारी (२७ ऑगस्ट) घरोघरी आगमन होणार आहे. यावर्षी गणेश चतुर्थीला म्हणजेच बुधवारी श्रीगणेश स्थापना आणि पूजन करण्यासाठी विशिष्ट मुहूर्त नाही. यंदा भद्राकरण असले, तरीही नेहमीप्रमाणे ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजेच पहाटे ४ वाजून ५० मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ५३ मिनिटांपर्यंत कधीही आपल्या घरात श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करता येईल’, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मध्यान्हनंतर देखील करता येईल, असे ‘दाते पंचांगकर्ते’चे मोहन दाते यांनी सांगितले. विशेष म्हणजे यंदाचा गणेशोत्सव हा दहा नव्हे अकरा दिवसांचा असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
ज्या गणेशाचे आवाहन आपण सुमुहूर्तमस्तु म्हणजे तू स्वतःच एक सुमुहूर्त आहेस, असे म्हणून करतो त्याच्या पूजनासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, विष्टिकरण तसेच राहूकाल, शिवालिखित आदी कोणतीही कोष्टके पाहण्याची आवश्यकता नाही. प्रात:कालापासून मध्यान्हपर्यंत कोणत्याही वेळी स्थापना व पूजा करता येते. श्री गणेश चतुर्थीच्या आधी एक दिवस किंवा त्याच दिवशी सकाळी मूर्ती आणावयास पाहिजे असे नाही, तर दुकानातून गणपतीची मूर्ती ८ ते १० दिवस आधी सुद्धा आणून घरामध्ये ठेवता येते. घरातील गणेशमूर्ती जास्तीत जास्त एक वीतभर उंचीची आणि आसनस्थ असावी. दरम्यान, पुढील वर्षी ज्येष्ठ अधिक मास असल्याने श्रीगणेशाचे आगमन उशिरा म्हणजे १४ सप्टेंबर रोजी होणार आहे, असेही दाते यांनी सांगितले.
गणेशोत्सवाचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळत असून, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाते.
यंदा गणेशोत्सव अकरा दिवसांचा…
काही वर्षी गणेशोत्सव दहा दिवसांचा तर काही वर्षी गणेशोत्सव अकरा दिवसांचा असतो. त्याला असे विशिष्ट कारण नसते. मागील वर्षी गणेशोत्सव अकरा दिवसांचा होता, यंदाही गणेशोत्सव अकरा दिवस साजरा होणार आहे, अशी माहिती मोहन दाते यांनी दिली.
गणेशोत्सवातील महत्त्वाचे दिवस
- बुधवार (२७ ऑगस्ट) – श्रीगणेश चतुर्थी – या दिवशी पहाटे ४ वाजून ५० मिनिटे ते दुपारी १ वाजून ५३ मिनिटांपर्यंत कधीही घरगुती गणेशाची प्रतिष्ठापना करता येईल.
- रविवार (३१ ऑगस्ट) – गौरी आवाहन – सूर्योदयापासून सायंकाळी ५ वाजून २७ मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्रावर आपल्या परंपरेप्रमाणे गौरी आवाहन करावे.
- सोमवार (१ सप्टेंबर) – गौरी पूजन – ज्येष्ठा नक्षत्रावर कुलाचारानुसार गौरींचे पूजन करावे.
- मंगळवार (२ सप्टेंबर) – गौरी विसर्जन – मूळ नक्षत्रावर सूर्योदयापासून रात्री ९ वाजून ५१ मिनिटांपर्यंत गौरी आणि कुलाचारानुसार गणपतीचे विसर्जन करावे.
काही कुटुंबामध्ये दीड दिवस, पाच व सात तर काही घरांत अनंत चतुर्दशीपर्यंत उत्सव साजरा केला जातो. तसेच, काही जणांकडे घरामध्ये गर्भवती असताना गणपती विसर्जन न करण्याची पद्धत आहे. पण ती बरोबर नाही. गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना केलेल्या पार्थिव गणेश मूर्तीचे विसर्जन होणे आवश्यक आहे आणि ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे, असे नसून पाण्यात विसर्जन करावे, असे आहे. – मोहन दाते, दाते पंचांगकर्ते