पुणे : जम्मू काश्मीरमधील ‘गणपतीयार ट्रस्ट’मध्ये गणेशोत्सव साजरा व्हावा, याकरिता पुण्यातील सात मंडळे एकत्र येऊन मूर्ती प्रदान सोहळा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे विश्वस्त व उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला आहे. काश्मीरमध्ये यंदा प्रथमच दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा होणार आहे.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टसह पुण्यातील पाच मानाच्या गणपती मंडळांसह अखिल मंडई मंडळाचे विश्वस्त एकत्र येत यंदा काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार श्रीनगर येथील गणपतयार टेम्पलचे संदीप कौल आणि शिशांत चाको यांच्याकडे पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती सार्वजनिक मंडळाच्या बाप्पाची प्रतिकृती सुपुर्त करण्यात आली.काश्मीरमध्ये यंदा दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यासाठी पुण्यातील कसबा गणपती मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ, गुरुजी तालीम गणपती मंडळ, तुळशीबाग गणपती मंडळ, केसरीवाडा गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ, अखिल मंडई मंडळ या सात मंडळांनी याकरिता पुढाकार घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून गुरुवारी या सर्व मंडळांनी एकत्र येत कश्मीरसाठी मूर्ती दान केली. हा कार्यक्रम श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे उत्साहात पार पडला.

हेही वाचा >>>धक्कादायक : भीक मागण्यासाठी चार वर्षांच्या चिमुरडीची दोन हजार रुपयांना विक्री, आई-वडिलांसह जात पंचायतीच्या पंचावर गुन्हा

यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे विश्वस्त, उत्सव प्रमुख पुनीत बालन, ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, गुरुजी तालिम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी , तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित, केसरी गणेशोत्सवाचे प्रतिनिधी अनिल सकपाळ, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी काश्मीरमधील गणपतीयार ट्रस्टचे संदीप कौल म्हणाले, पुण्यातील गणेशोत्सव मंडळांच्या पुढाकाराने कश्मीरमध्ये पहिल्यांदाच आम्ही गणेशोत्सव साजरा करत आहोत. याचा आम्हाला आनंद होत आहे. लाल चौकापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध गणपतयार मंदिरात येत्या गणेशोत्सव चतुर्थीला आम्ही या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा करणार असून दीड दिवसानंतर विसर्जन केले जाईल. पहिल्यांदाच अशा पद्धतीने काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>पुणे: रिक्षाचालकाच्या त्रासाला कंटाळून १५ वर्षाच्या मुलीची आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख पुनीत बालन म्हणाले की,हिंदुस्तानात गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यातून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य टिळकांनी केली.आज हाच गणेशोत्सव इतर देशातही साजरा होतो.मग तो आपल्याच देशात काश्मीरमध्ये का नाही ? असा प्रश्न पडला आणि त्यामुळेच काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय आम्ही सर्व मानाच्या मंडळांनी घेतला. या माध्यमातून काश्मीर खोऱ्यात सामाजिक सलोखा वाढण्यासोबतच सुख-समृध्दीही वाढेल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.