पुणे : समाज माध्यमातून मैत्रीचे आमिष दाखवून लूटणार करणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. या टोळीने पुणे शहरासह, ग्रामीण भागातील तरुणांना लुटल्याची माहिती उघडकीस आली आहे. नगर रस्त्यावरील शिक्रापूर परिसरात ९ ऑक्टोबर रोजी एका तरुणाचे अपहरण करुन त्याला लुटण्यात आले होते. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी सुशांत पोपट नागरे (वय २५), मयूर राजू गायकवाड (वय २४, दोघे रा. बोल्हेगाव, अहमदनगर) आणि श्रेयस भाऊसाहेब आंग्रे (२४, रा, नागापूर, अहमदनगर) यांना अटक केली होती. तरुणांना डेटिंग ॲपच्या माध्यमातून जाळ्यात ओढून आरोपींनी लुटमारीचे गुन्हे केले, अशी माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

पोलिसांनी आरोपींकडून एक मोटार जप्त केली आहे. या टोळीने लुटमारीचे तीन गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल असलेला लुटमारीचा गुन्हा उघडकीस आला आहे. पोलीस अधीक्षक देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षकअविनाश शिळीमकर, शिक्रापूर पोलिस ठाण्याचे दीपरत्न गायकवाड, अमित सिदपाटील, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, संजू जाधव, सागर धुमाळ यांनी ही कारवाई केली.

हे ही वाचा…पिंपरी- चिंचवड: वर्दळीच्या डांगे चौकात कचऱ्याचे ढीग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी नागरे आणि गायकवाड सराइत आहेत. त्यांच्याविरुद्ध नगरमधील तोफखाना आणि कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी भीती दाखवून लुटमारीचे गुन्हे केले. एका तक्रारदार तरुणाकडून त्यांनी ८० हजार रुपये उकळल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे तपास करत आहेत. डेटिंग ॲपच्य माध्यमातून फसवणूकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. तरुणींशी मैत्रीच्या आमिषाने चोरट्यांनी अनेकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.