पुणे : मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम चौकात दुचाकीला धडक देऊन सहप्रवासी महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ट्रकचालक आणि मालकाला पुणे न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या अपघातापूर्वी ट्रकचालकाने मद्यसेवन केले होते का, हे तपासण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून त्याच्या ट्रकची तपासणी केली जात आहे.

ट्रकचालक शौकतअली पापालाल हुलकुंडी (वय ५१, रा. भवानी पेठ, कासेवाडी व शिवनेरीनगर, कोंढवा) आणि मालक गोकुळ चंद्रकांत जवळकर (वय ४२, रा. मोहनननगर, धनकवडी) अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधासह भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या कलमांनुसार मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाधाम चौकात बुधवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास हा अपघात घडला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या गुन्ह्यात दोन्ही आरोपींना अटक करून गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. गंगाधाम चौक ते आईमाता रस्त्यावर सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत अवजड वाहतुकीला मनाई असतानाही मालक जवळकरने या रस्त्यावरून ट्रक चालविण्यास सांगितल्याची कबुली चालक शौकतअलीने दिली आहे. त्यामुळे या दोघांची एकत्रित चौकशी करायची आहे. ट्रकचालकाने मद्याचे सेवन केले आहे का, याची तपासणी करणारा अहवाल प्रयोगशाळेकडून मिळवायचा आहे. त्यामुळे दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी देण्याची तपास अधिकारी निरीक्षक सुनीता नवले आणि सरकारी वकील भाग्यश्री डागळे-संचेती यांनी केलेली मागणी न्यायालयाने मान्य केली.