पुणे : भारतात रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) तंत्रज्ञानाचा वापर फास्टॅगसाठी सुरू झाला, तेव्हापासून आजपर्यंत या तंत्रज्ञानाचा प्रसार अनेक क्षेत्रांत झाला आहे. हे तंत्रज्ञान विविध क्षेत्रांत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या तंत्रज्ञानाचा गेल्या २५ वर्षांतील प्रवास उलगडून दाखविणाऱ्या पांचजन्य अनुभव केंद्राचे उद्घाटन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
आय-टेक या कंपनीने हे केंद्र सुरू केले आहे. देशात सर्वप्रथम आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर करून फास्टॅगची सुरुवात या कंपनीने केली. कंपनीने फास्टॅगनंतर विविध क्षेत्रांत आरएफआयडी तंत्रज्ञानाचा यशस्वीपणे वापर केला आहे. या तंत्रज्ञानाचा प्रवास मांडणारे पांचजन्य अनुभव केंद्र कंपनीने सुरू केले असून, त्याचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला माजी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, आय-टेकचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी अशिम पाटील आणि कंपनीच्या अध्यक्षा अवंतिका पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी गडकरी म्हणाले, की आय-टेकने फास्टॅगच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावल्याने देशातील दर दुसऱ्या वाहनासाठी कंपनीने फास्टॅग उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर देशातील १०५ बंदरांवर कंटेनर ई-सील्सच्या माध्यमातून निर्यात व्यवहार अधिक सुरक्षित केले आहेत. कंपनीने आता रिटेल क्षेत्रात आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. या तंत्रज्ञानामुळे दर वर्षी ३०० कोटींपेक्षा जास्त वस्तूंचे ट्रॅकिंग करण्याची क्षमता निर्माण झाली आहे.
या प्रसंगी अशिम पाटील म्हणाले, की आय-टेकने आता २५ वर्षांचा टप्पा पार केला आहे. भारतात पथकरासाठी फास्टॅगचा वापर सुरुवात करण्यापासून कंपनीने योगदान दिले आहे. आम्ही गरूडा व्हिजिल या अत्याधुनिक क्लाऊड आधारित मंचाची सुरुवात करीत आहोत. या मंचाच्या माध्यमातून जागतिक पुरवठा साखळीचे व्यवस्थापन गतिमान होईल. कंपनीची आगामी काळात प्रारंभिक समभाग विक्रीची (आयपीओ) योजना आहे.
पांचजन्य केंद्रात काय?
या केंद्रात आरएफआयडी आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. यात पथकरासाठी फास्टॅग, रिटेल क्षेत्रातील वस्तू आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन, स्मार्ट फिटिंग रूम, जलद चेकआउट, कंटेनरच्या सुरक्षित हालचाली, स्मार्ट वेअर हाऊस आणि रिटेल पुरवठा साखळीचे कृत्रिम प्रज्ञाधारित नियंत्रणासाठी गरूडा व्हिजिल अशा अनेक गोष्टी उदाहरणांसह जाणून घेता येतात. याचबरोबर विविध क्षेत्रांत या तंत्रज्ञानाचा वापर झाल्याने भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत दिले जाणारे योगदानही या केंद्राच्या माध्यमातून अधोरेखित होते.