तांत्रिक प्रगतीमुळे दृक-श्राव्य कला प्रत्येकाच्याच आटोक्यात आली आहे. पण, नवीन गोष्टींविषयीचे भान मिळविणे हे अजून आले का हा प्रश्न आहे. काही मूठभरांच्या हातामध्ये चित्रपट कला राहिली तर, मर्यादित दृष्टिकोन आणि चाकोरी निर्माण होण्याची शक्यता असते. साधनांची विपुलता ही संधी आहे तशी ती धोकादायकही आहे. चित्रपट माध्यमात ग्यानबाची मेख सापडणे महत्त्वाचे आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेता गिरीश कुलकर्णी याने रविवारी व्यक्त केले.
सोशालिस्ट युवजन सभेतर्फे आयोजित स्मिता पाटील चित्रपट महोत्सव स्पर्धेतील विजेत्यांना गिरीश कुलकर्णी याच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ नेते भाई वैद्य कार्यक्रमाच्या अध्यक्षसस्थानी होते. सभेचे अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य, डॉ. नितीन केतकर, वर्षां गुप्ते, स्पर्धेचे परीक्षक गगनविहारी बोराटे आणि अतुल रुणवाल या वेळी उपस्थित होते. माहितीपट विभागामध्ये ‘सिल्व्हर गांधी’ने प्रथम तर, ‘बरका-द आर्क’ आणि ‘गोल्डन ग्रेन’ यांना संयुक्तपणे द्वितीय पारितोषिक मिळाले. लघुपट विभागामध्ये ‘हमारे घर’ने प्रथम तर, ‘लोकल’ आणि ‘लिटिल हँड्स’ यांना संयुक्तपणे द्वितीय पारितोषिक मिळाले. ‘सिल्व्हर ग्रेन’साठी रोहित पवार आणि ‘दोपहर’साठी शाजिया श्रीवास्तव आणि शरीफा रॉय यांना दिग्दर्शनाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
पारितोषिक देण्याइतके चित्रपटामध्ये सरस-नीरस असते का असा प्रश्न गिरीश कुलकर्णी याने उपस्थित केला. चित्रपट करणाऱ्याला आपला मार्ग शोधावा लागतो. भ्रामक, धूसर असे माध्यम असून आंतरिक प्रबळ ऊर्मीच्या जोरावर खुणा शोधत माग काढायचा असतो. ही समूह कला असल्याने हे श्रेय कुणा एकटय़ाचे नसते. स्वप्न सत्यामध्ये आणताना सर्वाचीच दमछाक होत असते. मात्र, हे करताना अनेकांना ग्यानबाची मेख सापडत नाही. त्यामुळे कलाव्यवहार बाळबोध आणि अभिरुचिहीन होत आहे, याकडे त्याने लक्ष वेधले.
युवकांमधील सर्जनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि त्यांच्यातील अभिव्यक्ती समोर यावी यासाठी चित्रपट महोत्सवाचा खटाटोप आहे. यंदा या महोत्सवात सर्बिया, लंडन, रशिया यांसह ८५ लघुपटांमध्ये स्पर्धा होती, असे डॉ. अभिजित वैद्य यांनी सांगितले.