पुणे : ‘पु. लं. देशपांडे यांचा भारतीय परंपरेचा, तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास होता. मात्र, ते प्रतिगामी, परंपरावादी नव्हते. ‘पुलं’नी माणूसकेंद्री दूरदृष्टीने साहित्याची निर्मिती केली. काळाच्या पलिकडे पाहण्याचे कसब त्यांच्याकडे होते. त्यांनी समकालात होत असलेले परिवर्तन टिपून भविष्यातील बदलांचा आढावा घेणाऱ्या साहित्याची निर्मिती केली. त्यांनी मराठी माणसाला जग दाखवले. ‘पुलं’ हे सर्वार्थाने काळाच्या पुढचे होते,’ असे मत ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

कोहिनूर ग्रुप प्रस्तुत आणि पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे आयोजित ‘ग्लोबल पुलोत्सवा’त ‘काळापुढचे पुलं’ या विशेष संवादात्मक कार्यक्रमात गोडबोले बोलत होत्या. ज्येष्ठ पत्रकार सुनंदन लेले, पुणे आकाशवाणीवरील कार्यक्रम अधिकारी गौरी लागू या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

गोडबोले म्हणाल्या, ‘पु. ल. देशपांडे यांनी माध्यमांचा खुबीने वापर करत श्रोत्यांना शहाणपण दिले. ते नवोन्मेषाचा काळ साकारणारे सादरकर्ते होते. त्यांनी साहित्य, नाटक, आकाशवाणी अशा अनेक माध्यमप्रकारात काम केले. ‘पुलं’च्या प्रतिभेला काळाची मर्यादा नाही. त्यांनीच व्यक्तिचित्रण हा वाङमयप्रकार मराठीत रूजवला. त्यांच्यामुळेच आमच्या पीढीला ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे, संगीतकार कुमार गंधर्व यांना जवळून ओळखता आले. ‘पुलं’च्या कामाचा विस्तार खूप मोठा आहे.’

‘कमीतकमी शब्दात परिणामकारक बोलणे हे ‘पुलं’चे वैशिष्ट्य होते. त्यांच्या स्वभावात हरण्याची भीती किंवा एकटे पडण्याची भीती नव्हती. त्यामुळे त्यांनी कोणत्याही परिस्थितीवर परखडपणे भाष्य केले. सहज विनोदाच्या माध्यमातून अवघड प्रश्नांवर बोलण्याचे, प्रसंगी राजकारण्यांनाही चिमटे काढण्याचे धाडस ‘पुलं’मध्ये होते,’ असे लेले यांनी सांगितले.

लागू म्हणाल्या, ‘वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव ‘पुलं’कडे होता. माध्यमांच्या प्रभावाविषयी दूरदृष्टी ठेवून त्यांनी अनेक प्रकारचे नियोजन केले. सुरूवातीच्या काळात आकाशवाणी, दूरचित्रवाणी या माध्यमांची घडी बसविली. श्राव्य माध्यमातही दृश्यात्मकता निर्माण होणे आवश्यक आहे, हे विचार त्यांच्या द्रष्टेपणाचे लक्षण होय. जोखमीचे काम करतानाही राष्ट्राच्या प्रतिभेचा विचार करणारी व्यक्ती म्हणून ‘पुलं’चे कार्य मोलाचे आहे.’

सतीश जकातदार यांनी स्वागत केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.

‘बालगंधर्व रंगमंदिराचे चित्रपटगृह होणार नाही’

‘पुण्यात बालगंधर्व रंगमंदीराची उभारणी करण्यामध्ये पु. ल. देशपांडे यांचा महत्वाचा वाटा आहे. त्यांनीच या रंगमंदिराची संकल्पना मांडली. त्यासाठी जगभरातील नाट्यगृहांचा अभ्यास केला. ‘ही रंगभूमी उभारताना त्याचे चित्रपटगृह होणार नाही, अशी मेख मी मारली आहे,’ असे ते म्हणत.’ अशी आठवण मंगला गोडबोले यांनी सांगितली.‘त्याकाळी बऱ्याच नाट्यगृहांचे सिनेमाघरांमध्ये रूपांतर होत होते. काळाच्या ओघात सिनेमा या माध्यम प्रकाराची मागणी ‘पुलं’नी ओळखली होती,’ असेही त्यांनी नमूद केले.