भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत पुण्यातील योगेश गोगावले, आमदार माधुरी मिसाळ आणि नगरसेविका प्रा. मेधा कुलकर्णी यांना प्रदेश चिटणीस या पदावर संधी मिळाली आहे. प्रभावशाली आणि तरुण नेतृत्वाला कार्यकारिणीत प्रदेश सरचिटणीस हे महत्त्वाचे पद देण्यात आले असून मराठा समाजालाही मोठे प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. कार्यकारिणीच्या घोषणेमुळे पुण्याच्या शहराध्यक्षपदाची चर्चाही आता सुरू झाली आहे.
प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेश कार्यकारिणीत तरुणवर्गाला मोठे स्थान दिले आहे. कार्यकारिणीत आतापर्यंत मागासवर्गातील नेत्यांकडे महत्त्वाची पदे देण्यात येत होती. यावेळी त्यांच्या बरोबरीनेच मराठा समाजालाही प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. तसेच समाजात प्रभाव असलेल्यांनाही महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. पुण्यातील योगेश गोगावले, आमदार माधुरी मिसाळ आणि नगरसेविका प्रा. मेधा कुलकर्णी यांच्यावर प्रदेश चिटणीस ही जबाबदारी देण्यात आली आहे. कार्यकारिणीची निवड करताना नव्यांना मोठी संधी देण्याची मूळ कल्पना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेता विनोद तावडे आणि फडणवीस यांची असून ती साकारल्याचे कार्यकारिणीवरून दिसत आहे.
पुण्यात शहराध्यक्षपदासाठी गेल्या वर्षी योगेश गोगावले इच्छुक होते. ते आता प्रदेशावर गेल्यामुळे ते पुन्हा या पदासाठी इच्छुक राहणार नाहीत. त्यामुळे या पदासाठी आता ज्येष्ठ नेते अनिल शिरोळे, गणेश बीडकर तसेच अशोक येनपुरे यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. सर्वानुमते नाव निश्चित करता आले नाही, तर आमदार माधुरी मिसाळ यांचेही नाव शहराध्यक्षपदासाठी येऊ शकते, असे सांगितले जात आहे.