पुणे : कोथरूड गोळीबार प्रकरणातील पसार झालेला गुंड नीलेश घायवळ हा युरोपात असल्याची मााहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांकडून त्याला ब्लू काॅर्नर नोटीस बजाविण्यात आली आहे. घायवळला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांनी इंटरपोलशी संपर्क साधल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.
घायवळ बनावट पारपत्राद्वारे परदेशात गेल्याची माहिती तपासात मिळाली आहे. घायवळचा भाऊ सचिन याच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी नुकतीच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली. सचिन घायवळ याचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. नीलेश घायवळला ताब्यात घेण्यासाठी यापूर्वी रेड काॅर्नर नोटीस बजाविण्यात आली होती.
त्यानंतर पुणे पोलिसांनी शनिवारी ब्लू कॉर्नर नोटीस बजावली आली. पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटनेला (इंटरपोल) पत्र पाठविले आहे. त्यानंतर ही नोटीस बजाविण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र मिळवल्याप्रकरणी घायवळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घायवळ याच्याविरुद्ध आतापर्यंत पाच गुन्हे दाखल झाले असून, बनावट पारपत्र मिळवून तो युरोपात गेल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली आहे.
तो ९० दिवसांच्या व्हिसावर स्वित्झर्लंडला गेल्याचे समोर आले आहे. अहिल्यानगरमधून त्याने ‘तत्काळ’ पारपत्र मिळविले आहे. ‘घायवळ’ ऐवजी ‘गयावळ’ नावाचा वापर करुन त्याने बनावट कागदपत्राच्या आधारे पारपत्र काढले आहे.
ब्लू काॅर्नर नोटीस म्हणजे काय ?
गंभीर गुन्ह्य्यात सामील असलेल्या आरोपीच्या तपासासाठी अतिरिक्त माहिती, ओळख, ठावठिकाणा मिळावा यासाठी ब्लू काॅर्नर नोटीस बजाविली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशांमधील पोलीस आणि गुन्हेगारांच्या माहितीचे आदानप्रदान करण्याचे काम या माध्यमातून केले जाते.