प्रसिद्ध विज्ञान लेखक व खोडद येथील जीएमआरटीचे इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ सुधीर फाकटकर यांच्या ‘खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप यांच्या जीवनकार्या’वरील पुस्तकाचे प्रकाशन राजहंस प्रकाशनचे संपादक डॉ. सदानंद बोरसे यांच्या हस्ते झाले. या वेळी पुस्तकाची प्रत डॉ. स्वरूप यांना प्रदान करण्यात आली.
राजहंस प्रकाशनाने ‘विज्ञानयात्री’ नावाने एक पुस्तक मालिका काढली असून त्यातील हे पुस्तक आहे. फाकटकर यांचे ‘रेडिओ दुर्बीण-अदृश्य विश्वाचा वेध’ हे पुस्तक यापूर्वी राजहंस प्रकाशनने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाला महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक पुरस्कार मिळाला होता. गोविंद स्वरूप यांनी भारतात १९५०-६० च्या सुमारास उटी व नंतर पुणे जिल्ह्य़ात खोडद येथे रेडिओ दुर्बिणीची उभारणी केली. वयाची ऐशी वर्षे पूर्ण केलेले गोविंद स्वरूप आजही तडफेने कार्यरत आहेत. त्यांची जडणघडण, विचार व कार्याचे दर्शन या पुस्तकात फाकटकर यांनी केले आहे.