पुणे : पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमची रुग्णसंख्या वाढली आहे. काही रुग्णांच्या तपासणीत त्यांना कॅम्पायलोबॅक्टर जेजूनी जीवाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दूषित पाणी अथवा अन्नातून हा संसर्ग होत असल्याने काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

पुण्यात आढळलेले रुग्ण हे प्रामुख्याने सिंहगड रस्ता परिसरातील आहेत. त्यामुळे त्यांच्या पिण्याचा पाण्याचा स्त्रोत एकच होता का, याचा शोध आरोग्य विभागाकडून घेतला जात आहे. याचवेळी त्यांनी एकाच परिसरात खाद्यपदार्थ खाल्ले होते का, याचाही शोध घेण्यात येत आहे. काही रुग्णांच्या तपासणीत कॅम्पायलोबॅक्टर जेजूनी हा जीवाणू संसर्ग समोर आला आहे. या जीवाणूचा संसर्ग हा प्रामुख्याने दूषित पाणी अथवा अन्नातू होतो. हा संसर्ग झाल्यानंतर अतिसार, पोटदुखी अशी लक्षणे दिसून येतात. काही रुग्णांमध्ये त्यांची प्रतिकारशक्ती जीवाणूऐवजी शरीरातील चेतासंस्थेवर हल्ला करते. त्यांना १ ते ३ आठवड्यांनी गुइलेन बॅरे सिंड्रोम होतो.

हेही वाचा – पुणे : शिवजयंती महोत्सवासाठी या सुविधा द्या, शिवभक्तांची महापालिकेकडे मागणी !

गुइलेन बॅरे सिंड्रोम हा चेतासंस्थेशी निगडित विकार आहे. त्यात शरीरातील प्रतिकारशक्तीच चेतासंस्थेवर हल्ला करते. त्यातून हात, पाय, गळा, तोंड आणि डोळे या भागात अशक्तपणा जाणवतो. हातपायाला मुंग्या येणे अथवा ते बधीर पडणे अशी लक्षणे दिसून येतात. रुग्णांना चालण्यासह अन्न गिळण्यात आणि श्वास घेण्यात अडचणी येतात. या विकारावर लक्षणांनुसार उपचार केले जातात. त्यात आयव्हीआयजी इंडेक्शन अथवा प्लाझ्मा बदलणे असे उपचार केले जातात. या विकाराचा रुग्ण योग्य उपचारानंतर बरा होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – दंडमाफीचा प्रस्ताव द्या, नगरविकास राज्यमंत्र्यांनी महापालिकेला काय केल्या सूचना ?

काळजी काय घ्यावी?

  • पाणी पिण्याआधी उकळून घ्या.
  • भाज्या आणि फळे स्वच्छ धुवून खा.
  • चिकन आणि मांस व्यवस्थित शिजवून खा.
  • अंडी, माशांसह इतर पदार्थ कच्चे खाऊ नका.
  • जेवणाआधी आणि स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर साबणाने हात धुवा.
  • खाण्याचे भांडे अथवा अन्नाची दुसऱ्याशी देवाणघेवाण करू नका.
  • कच्चे अन्न आणि शिजवलेले अन्न वेगवेगळे ठेवा.
  • स्वयंपाकघराचा ओटा आणि भांडी निर्जंतूक करून घ्या.

गुइलेन बॅरे सिंड्रोम हा विकार योग्य उपचारानंतर पूर्णपणे बरा होतो. नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून प्यावे. याचबरोबर बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. या विकाराची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा – डॉ. राहुल कुलकर्णी, अध्यक्ष, न्यूरॉलॉजिकल सोसायटी ऑफ पुणे</p>