पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर शिवसेनेला (ठाकरे) धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे हडपसर मतदार संघातील माजी आमदार महादेव बाबर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करणार असून, त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे या मतदरासंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी हडपसर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी महादेव बाबर इच्छुक होते. मात्र, शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेच्या पक्षांच्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली होती. शिवसेनेने ही जागा घ्यावी, अशी बाबर यांची भूमिका होती. ती मान्य न झाल्यामुळे ते नाराज होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते शिवसेना सोडणार असल्याची चर्चा होती.
शिवसेनेच्या अनेक कार्यक्रमांनाही ते अनुपस्थित राहिल्याने या चर्चेलाही बळ मिळाले होते. बाबर हे शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश करणार असल्याचेही बोलले जात होते. त्यानंतर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून बाबर यांची मनधरणी करण्यात आली होती. मात्र, ते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करणार असून, मुंबई येथे हा पक्ष प्रवेश होणार आहे.
शिवसेनेची हडपसर मतदारसंघात ताकद आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच माजी आमदारांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेला त्याचा फटका बसण्याची शक्यता असून, हडपसरमधील राजकीय समीकरणांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.