scorecardresearch

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे निम्मे जलतरण तलाव बंदच!

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहराच्या विविध भागांतील १३ जलतरण तलावांपैकी केवळ सहा तलाव सुरू असून, सात तलाव बंद आहेत.

swimming pool Pimpri Chinchwad mnc
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे निम्मे जलतरण तलाव बंदच! (संग्रहित छायाचित्र)

पिंपरी : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरातील नागरिकांची पावले पोहायला जाण्यासाठी जलतरण तलावाकडे वळत आहेत. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहराच्या विविध भागांतील १३ जलतरण तलावांपैकी केवळ सहा तलाव सुरू असून, सात तलाव बंद आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने केशवनगर, संभाजीनगर, कासारवाडी, पिंपरी वाघेरे, यमुनानगर, पिंपळेगुरव, नेहरूनगर, चऱ्होली वडमुखवाडी, भोसरी, मोहननगर, थेरगाव, सांगवी आणि आकुर्डी या भागांत १३ जलतरण तलावांची उभारणी करण्यात आली आहे. त्यातील चिंचवड केशवनगर, संभाजीनगर, कासारवाडी, पिंपरीवाघेरे, यमुनानगर आणि पिंपळेगुरव हे जलतरण तलाव चालू आहेत. तर, भोसरी, मोहननगर, सांगवी, थेरगाव, आकुर्डी या भागातील जलतरण तलाव बंद आहेत. या तलावांची खोली कमी करणे आणि गळती रोखण्यासाठी स्थापत्य विषयक कामे सुरू आहेत. त्यासाठी आणखी काही महिने लागतील. त्यामुळे या भागातील नागरिकांना, खेळाडूंना खासगी जलतरण तलावावर जास्त पैसे मोजून पोहण्यासाठी जावे लागणार आहे.

हेही वाचा – पुणे विद्यापीठ कुलगुरूपदासाठी दुसऱ्यांदा अर्ज प्रक्रिया

फेब्रुवारी महिना संपला असून तापमानातील तीव्रता वाढत आहे. उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मार्चमध्ये उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात जलतरण तलावांमध्ये पोहायला येणाऱ्यांची संख्या मोठी असते. महापालिकेच्या जलतरण तलावावर एक तास पोहण्यासाठी दहा रुपये शुल्क आकारण्यात येते. तसेच वयोगटानुसार तिमाहीसाठी २०० रुपये, सहामाहीसाठी ३५०, तर वार्षिक ५०० रुपयांपर्यंतचे पास देण्यात येतात. त्यामुळे महापालिकेच्या तलावावर उन्हाळ्यात प्रचंड मोठी गर्दी असते. महापालिकेच्या अयोग्य नियोजनामुळे उन्हाळा सुरू होऊनही सात जलतरण तलाव बंद आहेत. त्यामुळे खेळाडू, नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – मतपेट्यांच्या सुरक्षिततेसाठी ‘सीआयएसएफ’च्या जवानांचा पहारा

शहराच्या विविध भागांत महापालिकेच्या वतीने १३ जलतरण तलाव उभारले आहेत. यापैकी सद्यस्थितीत सहा तलाव सुरू आहेत. वडमुखवाडी येथील जलतरण तलाव नवीन असल्याने विविध अडचणी येत आहेत. पाणी १५ लाख लीटर लागत आहे. पाणी भरले असून गळती रोखण्यासाठीचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे आठवड्याभरात हा तलाव सुरू होईल. तर, नेहरुनगर येथील जलतरण तलाव पुढील दोन दिवसांत चालू करण्यात येईल. ऑनलाइन आरक्षण दिले जात आहे. पासची सुविधाही ऑनलाइन केली जाणार आहे. मानवी हस्तक्षेप ठेवण्यात येणार नाही. प्रत्येक तलावावर एकावेळी ८० जणांची बॅच करण्याचे नियोजन आहे. महापालिकेच्या https://www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावर जलतरण तलाव ऑनलाइन नोंदणीची ‘लिंक’ देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर माहिती भरून आरक्षण करता येईल, असे क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2023 at 16:57 IST
ताज्या बातम्या