पिंपरी : पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांना आरोग्य व स्वच्छता सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेच्या वतीने व्यापक नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या पुढाकाराने विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. पालखी मार्गावर विशेष स्वच्छता पथकांची नेमणूक केली आहे. पालखीच्या आगमनपूर्वी आणि प्रस्थानानंतरही परिसर चकाचक ठेवण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी वारीची नियोजन बैठक पार पडली. उपायुक्त सचिन पवार, माजी नगरसेवक जयंत बागल, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, सहायक आरोग्याधिकारी किशोर दरवडे, राजू साबळे, सुधीर वाघमारे, तानाजी दाते, शांताराम माने, संस्कार प्रतिष्ठान, गुणवंत कामगार मंडळ, वारकरी मंडळ, मराठवाडा सेवा संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, निसर्गसंवर्धन मंडळ, संत निरंकारी मंडळ, सायकल मित्र मंडळ या संस्थांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.
विनामूल्य स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे, आवश्यकतेनुसार जंतुनाशक फवारणी, फराळवाटप, पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य तपासणी, औषधवाटप शिबिरे, स्वयंसेवकांच्या साहाय्याने रस्ते व परिसर स्वच्छता, पालखी मार्गावर विशेष स्वच्छता पथकांची नेमणूक करण्याचा निर्णय बैठकीत झाला.
पालखी सोहळ्यासाठी स्वच्छता, तसेच आरोग्यविषयक सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहेत. हा उपक्रम स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने आणखी व्यापक पद्धतीने आरोग्य विभागाकडून राबविण्यात येईल. नागरिकांनीही पुढाकार घेऊन महापालिकेस सहकार्य करावे. – सचिन पवार, उपायुक्त, आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका.