पुणे : आषाढी वारी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी झालेले आहेत. या वारकऱ्यांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ ही मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत वारकऱ्यांची मोफत आरोग्यसेवा केली जात आहे. आतापर्यंत सुमारे अडीच लाख वारकऱ्यांना ही सेवा देण्यात आली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पालखी मार्गावर ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ या मोहिमेंतर्गत ४ हजार ३७६ अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. हे अधिकारी आणि कर्मचारी पालखी मार्गावर आवश्यकतेनुसार वारकऱ्यांना मोफत तपासणी व औषधोपचार उपलब्ध करून देत आहेत. या माध्यमातून आतापर्यंत आषाढी वारीतील २ लाख ४८ हजार २३३ वारकऱ्यांना आरोग्यसेवा देण्यात आली आहे. तसेच, २०३ तात्पुरत्या ‘आपला दवाखाना’च्या माध्यमातून प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर मोफत आरोग्य सेवा देण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

आरोग्य विभागाकडून ३३१ रुग्णवाहिकांमार्फत पालखी मार्गावर २४ तास आपत्कालीन स्थितीत आरोग्यसेवा दिली जात आहे. पुणे परिमंडळ व पुणे जिल्हा परिषदेची दोन आरोग्य पथके रुग्णवाहिकेसह पालखी सोहळ्याबरोबर परतीपर्यंत असणार आहेत. आरोग्य विभागाकडून २९० आरोग्यदूतांमार्फत दुचाकी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून पालखी मार्गावर आरोग्यसेवा देण्यात येत आहेत. याचबरोबर ३ हजार ५०० औषधी संचांचे प्रत्येक दिंडीप्रमुखांना मोफत वाटप करण्यात येत आहे.

महिला वारकरी भाविकांसाठी ३७ हिरकणी कक्षांची स्थापना पालखी मार्गावरील आरोग्य संस्थेच्या ठिकाणी, तसेच पालखी तळावर करण्यात आलेली आहे. पालखी मार्गावरील आरोग्य संस्थांमध्ये एकूण १५ स्त्रीरोगतज्ज्ञांमार्फत महिला वारकऱ्यांसाठी विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. पालखी मुक्कामच्या प्रत्येक ठिकाणी पाच रुग्णशय्या क्षमता असलेले ४६ अतिदक्षता विभाग उभारण्यात आले आहेत, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

पाण्याची तपासणी

पालखी मार्गावरील सर्व हॉटेल आणि त्यांमधील कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तसेच हॉटेलांमधील पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात येत आहे. पालखी मार्गावर १८६ टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येत असून, पालखी मार्ग आणि मुक्कामाच्या ठिकाणी धूरफवारणी, पाण्याच्या सर्व स्रोतांची तपासणी, तसेच आरोग्य संस्थांमार्फत जैवकचरा विल्हेवाट आदी उपाययोजना करण्यात येत आहेत, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वारकऱ्यांची आरोग्यसेवा

बाह्यरुग्ण संख्या – २ लाख ४७ हजार १४१
आंतररुग्ण संख्या – १ हजार ९२
एकूण – २ लाख ४८ हजार २३३