पिंपरी : शहर आणि परिसरातील उद्या (मंगळवारी १७ सप्टेंबर) होणार्‍या गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यानिमित्त विसर्जन घाटांसह ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. विसर्जन मिरवणुकीत ३२०० पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. दुपारी चार वाजल्यापासून पिंपरी आणि चिंचवड मधील वाहतुकीत बदल असणार आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०१४ सार्वजनिक गणेश मंडळांनी ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली. त्यातील सांगवी, तळेगाव दाभाडे यासह काही ठिकाणी सातव्या दिवशी गणेश मंडळांच्या गणपतींचे विसर्जन झाले आहे. उर्वरित सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपतींचे मंगळवारी विसर्जन होणार आहे. त्यानिमित्त, आयुक्तालयाकडून बंदोबस्तासाठी नियोजन करण्यात आले आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्वत्र भव्य विसर्जन मिरवणुका निघत असल्याने ठिकठिकाणी गर्दी असते. चिंचवडगावातील चापेकर चौक व पिंपरीतील शगुन चौक या मार्गांवरून मोठ्या संख्येने अनेक गणेश मंडळे मार्गस्थ होतात. तसेच, शहरासह इतर भागांतही मिरवणुकीचे भव्य नियोजन केले जाते. यासह विसर्जन घाटांवरही भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. मोठ्या उत्साहात लाडक्या गणरायाला निरोप दिला जातो. या दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. वरिष्ठ अधिकारी सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. ५३ पोलीस निरीक्षक, २४५ सहायक पोलीस निरीक्षक आणि फौजदार, २४४० पोलीस अंमलदार, ५०० होमगार्ड, एक एसआरपीएफ कंपनी, बॉम्ब शोधक आणि नाशक (बीडीडीएस) पथक, ११ आरसीपी स्ट्रायकिंग एवढा बंदोबस्त सज्ज आहे.

हे ही वाचा… विद्यापीठाच्या आवारात पुन्हा चंदन चोरी- शहरात चंदन चोरट्यांचा धुमाकूळ

चिंचवडमधील वाहतुकीत बदल

चिंचवडमधील वाहतुकीत दुपारी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत बदल असणार आहे. अहिंसा चौक ते चापेकर चौकाकडे जाणारा मार्ग बंद राहणार असून ही वाहतूक एसएएफ चौकातून खंडोबा माळ मार्गे वळविण्यात येणार आहे. दळवीनगर पुलाकडून चापेकर चौकाकडे जाणारा मार्ग बंद राहणार असून ही वाहने एसकेएफ चौकाकडून बिजलीनगर मार्गे जातील. वाल्हेकरवाडी टी जंक्शनकडून चापेकर चौकाकडे जाण्यास बंदी असून वाल्हेकरवाडी जुना जकात नाका डावीकडे वळून जैन शाळेपासून बिजलीनगर अथवा एसकेएफ-खंडोबा माळ मार्गे जाता येईल. लिंकरोडवरून चापेकर चौकातील पीएमटी बस थांबा येथून चापेकर चौकात जाण्यास बंदी असून लिंकरोडने डावीकडे वळून काळेवाडी मार्गे पुढे जाता येईल. भोई आळी तसेच चिंचवड चौकी येथून चापेकर चौकात जाण्यास बंदी असून केशवनगर मार्गे पुढे जाता येईल. चिंतामणी चौक-वाल्हेकरवाडी रिव्हर व्ह्यू चौकाकडे जाण्यास वाहनांना बंदी असून चिंचवडेफार्म वाल्हेकरवाडी पूल रावेत मार्गे पुढे जाता येईल.अहिंसा चौक व रिव्हर व्ह्यू चौकाकडून चापेकर उड्डाणपुलावरून जाण्यास बंदी असून रिव्हर व्ह्यू चौकाकडून वाल्हेकरवाडी मार्गे अथवा अहिंसा चौक ते महावीर चौक अथवा एसकेएफ चौक मार्गे जाता येईल.

हे ही वाचा…पुणे : उद्योजकाकडून बंदुकीसह २१५ काडतुसे जप्त,आर्थिक वादातून उरुळी कांचन परिसरात गोळीबार

पिंपरीतील वाहतूक बदल

दुपारी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत पिंपरीतील वाहतुकीत बदल असणार आहे. पिंपरी चौकाकडून शगुन चौकाकडे जाणारा मार्ग बंद राहणार असून पिंपरी पुलावरून उजवीकडे वळून भाटनगर मार्गे, मोरवाडी मार्गे एम्पायर इस्टेटच्या मदर टेरेसा पुलावरून काळेवाडी मार्गे जाता येईल. काळेवाडी पुल ते डिलक्स चौक, कराची चौकाकडे जाण्यास बंदी राहणार असून या मार्गावरील वाहतूक काळेवाडी पुलावरून उजवीकडे वळून जमतानी चौक व गेलार्ड चौकाकडून महात्मा फुले महाविद्यालय येथून उजव्या बाजूला वळून नव महाराष्ट्र शाळा येथून पुढे जातील. पिंपरी चौकातून गोकुळ हॉटेलकडे जाण्यास बंदी असून ही वाहतूक पिंपरी सेवा रस्त्याने क्रोमा शोरूम समोरील रस्त्याने जाईल. सर्जा हॉटेल ते पवनेश्वर मंदिर या मार्गावरील वाहतूक बंद राहणार असून ही वाहतूक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पिंपरी येथून वळविण्यात आली आहे.

हे ही वाचा…पुणे : सायबर चोरट्यांकडून तिघांची ६८ लाखांची फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिरवणूक मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतुकीचे चोख नियोजन केले आहे. अनेक मार्गांत बदल केले असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त नेमण्यात आला आहे. काही संशयास्पद आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी केले आहे.