कचऱ्याला लागलेल्या आगीमध्ये विजेच्या उच्चदाब वाहिन्या जळाल्याने बालेवाडी आणि बाणेर परिसरातील वीजपुरवठा शुक्रवारी संध्याकाळी खंडित झाला. त्यामुळे ऐन पावसात नागरिकांचे हाल झाले. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बाणेर भागातील महाबळेश्वर हॉटेलच्या जवळील कचऱ्याला संध्याकाळी पाचच्या सुमारास आग लागली होती. या आगीचा फटका या भागातून जाणाऱ्या चार उच्चदाब वीज वाहिन्यांनाही बसला. वाहिन्यांनाही आग लागून त्या जळाल्या. त्यामुळे बाणेर, परिसरासह बालेवाडी भागातील अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. जुनी सांगवी भागातील वीजपुरवठ्यालाही त्याचा फटका बसला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर महावितरणकडून वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र, उच्चदाब वाहिन्यांचे काम असल्याने त्याला विलंब झाला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत अनेक भागात वीजपुरवठा बंदच होता. कचऱ्याला नेमकी आग कशी लागली, हे समजू शकले नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले. वीज यंत्रणा किंवा वीजवाहिन्या जात असलेल्या भागामध्ये कचरा टाकू नये किंवा असलेला कचरा जाळू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.