राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेना आणि भाजप यांच्यात जुंपली असताना गुरुवारी पुण्यातही शिवसेनेने भाजपविरोधात दंड थोपटले. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाचा शहरात समावेश करण्याचा पालकमंत्री गिरीश बापट यांचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

सर्वोच्च न्यायालायने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील ५०० मीटरच्या परिसरात दारू विक्रीस बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. हे रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी राज्य सरकारला पत्र पाठविले आहे. या घडामोडीच्या मागे पालकमंत्री गिरीश बापट हे असून कोणत्याही परिस्थितीमध्ये शहरात हे रस्ते येता कामा नये, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने पुणे महापालिकेत भजन करत आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्र्याच्या फोटोला दारुच्या बाटल्यांची माळ घालून आंदोलन केले.

या आंदोलनाविषयी शिवसेना गटनेते संजय भोसले म्हणाले की, पुणे शहराच्या हद्दीतील राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग महापालिकेत समावेश करण्याच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. हे रस्ते महापालिकेत घेण्याबाबत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला आहे. या सर्वामागे पालकमंत्री गिरीश बापट यांचा हात आहे. हे रस्ते महापालिकेत आल्यास या निर्णयाच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेने यावेळी दिला.