पुणे : पुण्यातील पूर्व भागात नवीन गृहप्रकल्पांचे प्रमाण वाढत आहे. त्याखालोखाल पश्चिम भागात गृहप्रकल्पांची उभारणी सुरू आहे. पूर्व आणि पश्चिम भागात मिळून सुमारे ७० टक्के गृहप्रकल्प आहेत. दक्षिण आणि उत्तर भागातील गृहप्रकल्पांची संख्या ३० टक्के आहे. मागील वर्षभरात घरांच्या किमतीत १२ ते १५ टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती व्हीटीपी रिॲलिटीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन भंडारी यांनी दिली.

मागील काही वर्षात शहराच्या बाह्य भागात प्रामुख्याने नवीन गृहप्रकल्प उभे राहत आहेत. त्यात माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्या असलेल्या भागात हे प्रकल्प प्रामुख्याने आहेत. पुण्याच्या पश्चिमेला हिंजवडी, बाणेर, बालेवाडी, पाषाण आणि वाकड भागात गृहप्रकल्प प्रामुख्याने उभे राहत होते. आता पुण्याच्या पूर्वेला वाघोली, खराडी आणि मांजरी या भागात गृहप्रकल्प वाढू लागले आहेत. अनेक ठिकाणी जागा अपुऱ्या पडू लागल्याने अनेक बांधकाम व्यावसायिक शहराच्या बाहेरील बाजूला जागा घेऊन प्रकल्प सुरू करीत आहेत, असे भंडारी यांनी सांगितले.

मध्यम आकाराच्या घरांना मागणी जास्त दिसून येत आहे. याचबरोबर आलिशान घरांनाही मागणी सातत्याने वाढत आहे. मागील काही वर्षे जागांच्या किमतीसोबत बांधकाम खर्चातही वाढ होत आहे. याचबरोबर मजुरांचा खर्चही वाढत आहे. त्यामुळे मागील वर्षभरात घरांच्या किमतीत १२ ते १५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. व्हीटीपीकडून चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत १ कोटी चौरस फुटांच्या घऱांचा वितरणाचा टप्पा गाठला जाईल. त्यातील एकूण ५० लाख चौरस फुटांची घरे चालू आर्थिक वर्षात ग्राहकांच्या ताब्यात दिली जातील, असे भंडारी यांनी नमूद केले.

हेही वाचा : श्री संत तुकाराम महाराज संस्थांनच्या अध्यक्षांचा कीर्तनकारांवर आक्षेप, म्हणाले,’ ‘विद्रुपीकरणाचे पाप…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील वर्षी दीड लाख मालमत्तांचे व्यवहार

नाइट फ्रँक इंडियाच्या अहवालानुसार, पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मागील वर्षी मालमत्तांचे १ लाख ५२ हजार व्यवहार झाले. त्यातून सरकारला ५ हजार ३५२ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळाले. पुण्यात २०२२ मध्ये १ लाख ३९ हजार ३२ व्यवहार झाले होते तर त्यातून ४ हजार ८४३ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळाले होते. मागील वर्षी मालमत्तांच्या व्यवहारात ९.६ टक्के आणि मुद्रांक शुल्क संकलनात १० टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. घर खरेदी करणाऱ्यांमध्ये ३० ते ४५ वयोगटातील सर्वाधिक ५२ टक्के ग्राहक आहेत.