पुणे : ‘स्वत:च्या मालकीच्या घरात राहत असलेल्या आणि महापालिकेचा पीटी-३ अर्ज भरून दिल्यानंतरही ज्या नागरिकांना मिळकत कराच्या बिलात ४० टक्के सवलत मिळाली नाही, अशा नागरिकांनी जवळच्या क्षेत्रिय कार्यालयात जाऊन खातरजमा करावी. पीटी-३ अर्जाबरोबर आवश्यक कागदपत्रे जोडली नसल्यास संबंधित मिळकतधारकाने त्यांची पूर्तता करावी,’ असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

महापालिकेच्या मिळकत कर विभागाच्या वतीने २०२५-२६ या वर्षासाठीच्या मिळकत कर बिलांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. एक मे पासून मिळकत कराची बिले दिली जात आहेत. १ एप्रिल २०१९ पूर्वी मिळकत कर आकारणी झालेल्या मिळकतींना करामध्ये ४० टक्के सवलत होती. मात्र, राज्य सरकारने ही सवलत काढून घेतली. तसेच, महापालिकेने केलेल्या जीआयएस सर्व्हेनंतर १ एप्रिल २०१८ पासून एकाच व्यक्तीच्या एकापेक्षा अधिक मिळकती असल्यास इतर मिळकतींची ४० टक्के सवलत महापालिकेकडून काढून घेण्यात आली होती.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी २०२३ मध्ये राज्य सरकारने स्वमालकीच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना मिळकत करात ४० टक्के सवलत देण्याचा निर्णय पुन्हा जाहीर केला. मात्र, ही सवलत लागू करताना संबंधित मिळकतधारकांकडून ते स्वत: त्या मिळकतीत राहत असल्याबाबत पीटी – ३ अर्ज भरून घेतले तसेच दोन रहिवासी पुरावेदेखील त्यांच्याकडून घेण्यात आले आहेत. महापालिकेकडे नागरिकांनी जमा केलेल्या पीटी -३ अर्जांची तपासणी करून महापालिकेने चालू आर्थिक वर्षाच्या मिळकतकराच्या बिलात त्यांना ४० टक्के सवलत दिली आहे. त्याचा उल्लेखही महापालिकेने बिलांवर केला आहे.

ज्या मिळकतदारांनी पीटी-३ अर्जाबरोबर आवश्यक पुरावे दिले नाहीत, त्यांना मिळकत करात सवलत देण्यात आलेली नाही. अशा नागरिकांनी ते राहत असलेल्या क्षेत्रिय कार्यालयांतील मिळकत कर विभागात जावे. तेथे आवश्यक रहिवासी पुरावे व कायदेशीर पूर्तता करावी, असे आवाहन अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिळकत करामध्ये ४० टक्के सवलत मिळविण्यासाठी नागरिकांकडून पीटी-३ अर्ज भरून घेण्यात आले होते. त्याची तपासणी करून सवलत देण्यात आली आहे. मिळकतदारांना यामध्ये शंका, अडचण असल्यास त्यांनी महापालिकेत येण्यापूर्वी जवळच्या क्षेत्रीय कार्यालयातील मिळकत कर विभागात जाऊन खात्री करावी. पृथ्वीराज बी. पी. अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका