नारायण राणे यांच्याकडून अदानींची अप्रत्यक्ष पाठराखण

जगात सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्यांची यादी दरवर्षी प्रसिद्ध होते. त्यात एक-दोन भारतीय देखील असतात. जगभरातून या उद्योजकांचे कौतुक होते. मात्र, भारतात त्यांच्यावर संशय घेतला जातो. प्रत्येक उद्योजक रोजगार देऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला मदत करतो. प्रत्येक उद्योजकाकडे वेगळय़ा नजरेने पाहायला लागलो, तर देशात बाहेरून उद्योजक येणार नाहीत, नव्याने गुंतवणूक येणार नाही, अशा शब्दांत केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी अदानी यांची पाठराखण केली.

माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने मुक्तछंद, घे भरारी आणि देआसरा फाउंडेशन यांच्या वतीने उद्योजकांसाठी विनामूल्य परिसंवाद कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री राणे म्हणाले, ‘प्रत्येक उद्योग रोजगार देत असतो. तसेच अर्थव्यवस्थेला मदत करत असतो. सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्या उद्योजकांचे जगभरातून कौतुक होते. मात्र, आपण त्यांचे कौतुक करणे सोडा, त्यांच्याकडे संशयाने पाहतो. अशा मानसिकतेमुळे परदेशातून भारतात उद्योजक येणार नाहीत, गुंतवणूक येणार नाही. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांना कर्ज मिळण्यात अडचणी येत असल्यास माझ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि बँकांना तशा सूचना दिल्या जातील. ज्या उद्योजकांना कर्जासाठी अडचणी येत आहेत, त्यांनी त्रुटी दूर करून नव्याने अर्ज करावा.’

दरम्यान, पत्रकार शशिकांत वारीशे यांना कधीच भेटलो नाही, त्यांच्याशी माझा संबंध नसून त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेशीदेखील माझा संबंध नाही. वारीशे मृत्यूप्रकरणी पोलीस चौकशी करत असून सत्य बाहेर येईल, असे राणे यांनी सांगितले.कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत राणे म्हणाले, की कसबा, चिंचवड या दोन्ही जागा मोठय़ा मताधिक्याने भाजप जिंकेल. या निवडणुकांत विरोधकांचा सुपडा साफ होईल. भाजप हा ग्रामपंचायत ते संसदेपर्यंत सर्व प्रकारच्या निवडणुका गांभीर्याने घेऊन लढवतो. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात येत असतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी कशाला मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहू?
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल, हे पंतप्रधान मोदी ठरवतील. मी केंद्रीय मंत्री असल्याने मी कशाला केंद्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहू, अशी मिश्किल टिप्पणी केंद्रीय नारायण राणे यांनी केली. तसेच केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामांचे लोकार्पण पंतप्रधान मोदीच करणार. आम्ही केलेल्या कामांचे लोकार्पण आम्ही नाही, तर दुसरे कोण करणार? त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचा मुंबई दौरा आणि निवडणुका यांचा संबंध नाही.