पुणे : ह्युंदाई मोटार इंडिया लिमिटेड कंपनीने तळेगावमध्ये मोटारनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आधी केली होती. आता कंपनीने ही गुंतवणूक वाढवून ११ हजार कोटी रुपयांवर नेली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उन्सू किम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला. या प्रकल्पाच्या माध्यमातून ७ हजार ६०० प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत.

ह्युंदाई कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उन्सू किम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची१५ सप्टेंबरला भेट घेतली. त्यानंतर कंपनीच्या शिष्टमंडळासोबत वर्षा निवासस्थानी त्यांनी बैठक घेतली. या बैठकीत फडणवीस म्हणाले, ‘वाहन उद्योगात ह्युंदाई कंपनीचे मोठे नाव आहे. कंपनीने राज्यातही गुंतवणूक केली आहे. पुण्यातील प्रकल्पातून वाहन उत्पादनात वाढ होणार आहे.

कंपनीने राज्यात वाहन उद्योगात अधिकाधिक गुंतवणूक करून रोजगारनिर्मितीत वाढ करावी. कंपनी राज्यात सामाजिक उत्तरदायित्वांतर्गत विविध कामांसाठी ५६ कोटी रुपयांचा निधी देत आहे. ही बाब स्तुत्य असून, या निधीतून राज्यात सुरू असलेली कामे पथदर्शी ठरतील. राज्यात उद्योगस्नेही वातावरण तयार करून उद्योगांना सहकार्य करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे.’

मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतर ह्युंदाईचे व्यवस्थापकीय संचालक उन्सू किम यांनी कंपनीची पुण्यातील तळेगाव प्रकल्पातील गुंतवणूक वाढविण्याची घोषणा केली. ह्युंदाई मोटार इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ‘महाराष्ट्रात कंपनीकडून गुंतवणुकीत वाढ केली जात आहे. कंपनीच्या दीर्घकालीन धोरणाचा हा भाग आहे.

कंपनीने आता तळेगाव प्रकल्पातील गुंतवणूक सात हजार कोटींवरून ११ हजार कोटी रुपयांवर नेली आहे. यामुळे कंपनीच्या प्रकल्पाची उत्पादनक्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ७ हजार ६०० प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. याचबरोबर अप्रत्यक्ष रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. यातून या परिसरातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.’

तळेगाव प्रकल्पातील वाढीव गुंतवणुकीचा वापर प्रामुख्याने अत्याधुनिक निर्मिती तंत्रज्ञान, सेव्हन्थ जनरेशन पेंट शॉप, ऑटोमेशन टूल्स, पायाभूत सुविधा अद्ययावत करणे आणि ई-वाहननिर्मितीसाठी सज्जता यासाठी होणार आहे. तळेगावमधील प्रकल्पातून देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी मोटारींची निर्मिती केली जाणार आहे. – प्रवक्ता, ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड.