पुणे : भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर पुणे) वतीने डॉ. रघुनाथ माशेलकर यांना ‘मानद डॉक्टरेट’ने गौरविण्यात आले. ‘आयसर’ पुणेचे संचालक डॉ. सुनील भागवत यांच्या हस्ते माशेलकर यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. भारताच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे या वेळी उपस्थित होते. माशेलकर यांनी ऑनलाईन माध्यमातून सहभाग नोंदवला. याच कार्यक्रमात ३५२ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आले.
डॉ. मांडे म्हणाले, ‘समाजातील विविध गरजांसाठी, व्यवहारांसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केल्यास एकाच घटनेचे पैलू शोधता येतात. त्यांचे समीक्षात्मक विश्लेषण करता येते. नैसर्गिक संसाधनांचा जबाबदारीने वापर करण्यासाठी त्याचा वापर करता येतो. माणसाने केलेले निसर्गाचे नुकसान भरून काढण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाचा उपयोग करायला हवा. त्यासाठी विज्ञानाचे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरते.’
‘दोन वेळचे अन्न मिळवणे अवघड असतानाही आईने मला उच्च शिक्षण दिले. अत्यंत गरीब परिस्थितीत तिने संघर्ष केला. आम्हाला शिकवले. आज ही मानद पदवी आईला अर्पण करीत आहे. आजपासून आयसरचा विद्यार्थी झालो आहे. आता संस्थेला जागतिक पातळीवर सर्वोच्च स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे,’ असे डॉ. माशेलकर म्हणाले. पदवीधर विद्यार्थ्यांना एकाग्रतेने काम करून संधीची कवाडे खुली करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.