नवीन आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होत आहे. चालू आर्थिक वर्षातील हा अखेरचा महिना असून, पुढील महिन्यात अनेक नवीन बदल होत आहेत. आर्थिक वर्ष बदलताना सर्वांना या बदलांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षातील काम या महिन्याच्या अखेरीस पूर्ण करून नवीन वर्षासाठी सज्ज राहण्याची आवश्यकता आहे.
हेही वाचा >>>पिंपरी: हिंजवडीत सराईत गुन्हेगार निलेश गायवळचे फलक; गुन्हा दाखल
नवीन आर्थिक वर्षात अनेक बदल होणार आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. हे बदल जाणून घेतल्यास तुम्हाला चिंता न करता वेळेत कामे पूर्ण करता येतील. पुढील महिन्यात होणाऱ्या बदलांमध्ये आधारशी पॅन संलग्न करणे, इंधन दरातील बदल या बाबी महत्वाच्या आहेत. पुढील महिन्यातील बँकांच्या सुट्यांमुळेही तुम्हाला आर्थिक गोष्टींचे बारकाईने नियोजन करावे लागणार आहे.
इंधन दरातील बदल
सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरातील बदल जाहीर करतात. मार्च महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपये वाढ करण्यात आली होती. याचवेळी व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात ३५० रुये वाढ करण्यात आली होती. आता पुढील महिन्यात त्यात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>पुणे: एक दशकापासून कागदावरच राहिलेल्या रस्त्यासाठी स्थानिक रहिवाशांची मुंबई उच्च न्यायालयात धाव !
बँकांना १५ दिवस सुट्या
रिझर्व्ह बँकेने एप्रिल महिन्यातील सुट्यांची यादी जाहीर केली आहे. यानुसार, पुढील महिन्यात १५ दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. साप्ताहिक सुट्या वगळता विविध राज्यांतील वेगवेगळ्या सणांच्या सुट्या असल्याने १५ दिवस बँकांना सुट्या असतील. त्यामुळे बँकांशी निगडित कामे लवकरात लवकर पूर्ण करावी लागतील.
आधारशी पॅन संलग्न करणे बंधनकारक
तुमचे पॅन आधारशी संलग्न करणे बंधनकारक आहे. यासाठी ३१ मार्चची अंतिम मुदत आहे. या मुदतीत आधारशी पॅन संलग्न न केल्यास ते निष्क्रिय होऊ शकते. त्यामुळे तुमचे अनेक महत्त्वाचे व्यवहार पुढील महिन्यात अडकू शकतात.
सोने विक्रीच्या नियमांत बदल
ग्राहक मंत्रालयाने पुढील महिन्यापासून सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीत मोठा बदल केला आहे. यानुसार ३१ मार्चनंतर दागिन्यांवरील चार अंकी हॉलमार्क क्रमांक ३१ मार्चनंतर बंद होणार आहे. १ एप्रिलपासून सहा अंकी असलेल्या हॉलमार्क दागिन्यांची विक्री बंधनकारक असणार आहे.