पुणे : सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ३८ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आणि कुटुंबीय हडपसर परिसरातील वैभव चित्रपटगृह परिसरात असलेल्या सेजल गार्डन सोसायटीत राहायला आहेत. शनिवारी सायंकाळी सदनिका बंद करून कुटुंबीय बाहेर गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाटातून सोन्याचे दागिने, हिरेजडित दागिने, रोकड असा ३८ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज लांबवून चोरटे पसार झाले. घरफोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने रविवारी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक जौंजाळ तपास करत आहेत.
बंडगार्डन रस्त्यावरील नारंगीबाग परिसरातील एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबविण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला नारंगीबाग परिसरातील नित्यानंद काॅम्प्लेक्स सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार जढर तपास करत आहेत.
मार्केट यार्ड भागातील एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी परदेशी चलन, ६५ हजारांचे दागिने, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एकाने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील गणात्रा काॅम्प्लेक्स सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाटातून परदेशी चलन, दागिने, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक आवारे तपास करत आहेत.
धायरीत घरफोडी
सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेचार लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एकाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार धायरीतील राजवीर रेसिडन्सी सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. कपाटातील साडेचार लाख रुपयांचे दागिने लांबवून चोरटे पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव तपास करत आहेत.