पुणे : सोसायटीच्या आवारातील सात दुचाकी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे भागात ही घटना घडली. याबाबत सागर पहलाज ललवाणी (वय ३२) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललवाणी हे नऱ्हे परिसरातील सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटीत राहायला आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीच्या आवारात लावलेल्या दुचाकींना सोमवारी पहाटे आग लागल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास आले. रहिवाशांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत रहिवाशांनी पाणी ओतून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सात दुचाकी जळाल्या आहेत. दुचाकी जाळण्यामागचे निश्चित कारण समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.